21 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपुरतीच भाडेवाढ; सणानिमित्त एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ; 3775 परिवहन कर्मचाऱ्यांना मिळणार 5 हजारची दिवाळी भेट
रत्नागिरी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त आपल्या सर्वच मार्गावरील फेऱ्यांमध्ये 10 टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार रत्नागिरी परिवहन महामंडळानेही 21 ऑक्टोबर ते 10 नाव्हेंबरदरम्यान ही भाडेवाढ केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आडवळणाच्या रस्त्यांवरुन धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लाल गाडी हे आजही वाहतुकीचे मुख्य साधन आहे. त्यामुळे सणाच्या दिवसांमध्ये या लालपरीला मोठी गर्दी असते. याच संधीचा फायदा उठवत राज्य परिवहन महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 21 ऑक्टोबर ते 10 नाव्हेंबर या कालावधीपुरतीच मर्यादित आहे, असे रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिकारी ए. पी. जाधव यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त एसटीच्या फेऱ्यांमध्ये ही वाढ झाल्याचे जाधव यांनी सांगितले.
3 हजार 775 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र भरात परिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांना 5 हजाराची दिवाळी भेट देण्यात आली आहे. याचा लाभ रत्नागिरीतील 3 हजार 775 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.









