डॉक्टरांकडून स्पष्टीकरण : नागरिक संतप्त
वृत्तसंस्था/ मुर्शिदाबाद
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मागील 24 तासांमध्ये 9 नवजात शिशू आणि 2 वर्षीय मुलांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे 10 वर्षांनी पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे.
नवजातांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात अफरातफरीची स्थिती आहे. रुग्णालयानुसार मुलांचा मृत्यू कुपोषण, श्वसनसंबंधी समस्यांमुळे झाला आहे. मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य अमित दाऊ यांनी यावेळी मुलांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे झाल्याचे म्हटले आहे. तीन मुलांचा मृत्यू मार्टिमामुळे झाला आहे. तर एकाचा मृत्यू रेस्पिरेटरी लो डिस्ट्रेस सिंड्रोममुळे ओढवला आहे. जन्मावेळी अत्यंत कमी वजनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. जन्मानंतर एका नवजाताचे वजन केवळ 400 ग्रॅम होते असे दाऊ यांनी सांगितले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या नवजातांपैकी तीन जणांचा जन्म वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातच झाला होता. उर्वरित दहा जणांना अन्य रुग्णालयांमधून आणले गेले होते. डोमकोल आणि लालबाग उपविभागीय रुग्णालयातून दाखल करण्यात आलेल्या मुलांना वाचविणे शक्य नव्हते. यातील एकाचा मृत्यू जन्मावेळी झालेल्या गुंतागुंतीमुळे झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे रुग्णालयात सातत्याने होत असलेल्या नवजातांच्या मृत्यूप्रकरणी तज्ञ डॉक्टरांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शुक्रवारी स्वत:चा अहवाल सोपविणार आहे. तर 10 मृत्यू हे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे झाल्याचे रुग्णालयाकडून प्रथम सांगण्यात आले होते.









