वृत्तसंस्था / अहमदाबाद
2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा यजमानपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून भारताचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आतापासूनच देशात पूर्वतयारीचा आढावा घेवून विविध प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. गांधीनगरमधील एका क्रीडा संकुलाच्या कोनशीला समारंभ नुकताच झाला. या सामारंभावेळी केंद्रीक गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये आधुनिक सुविधांसह 10 स्टेडियम्सची उभारणी केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
गांधीनगरच्या सरदार पटेल क्रीडा संकुलनामध्ये 10 स्टेडियम्सची उभारणी केली जाईल,असेही गृहमंत्री शहा यांनी सांगितले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या जवळच हे नवे क्रीडा संकुल असून या संकुलात ही नवी स्टेडियम्स उभारली जाणार आहे. गुजरात शासनाकडून आतापासूनच ऑलिम्पिक पूर्व तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. गांधीनगरमधील क्रीडा संकुलाकरिता 316.82 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. 2002 साली गुजरातमधील सत्ताधारी असलेल्या शासनाकडून आर्थिक बजेटमध्ये क्रीडा विभागाकरिता केवळ 2 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले होते. पण आता गुजरात शासनाने आपल्या अर्थसंकल्पात 352 कोटी रुपयांची तरतूद क्रीडा विभागासाठी केली आहे.









