शस्त्रसाठा लुटल्यानंतर सरकारचा निर्णय; शोध मोहिमेत 1195 शस्त्रे जप्त
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय दलाच्या आणखी 10 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कराची शस्त्रे लुटल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी जमावाने मोईरंग आणि नरसेना पोलीस स्टेशनवर हल्ला करून 685 शस्त्रे आणि 20 हजारांहून अधिक काडतुसे लुटल्यानंतर सुरक्षा आणखी भक्कम करण्यासाठी सरकारकडून हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.
मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून पुन्हा तणाव वाढला आहे. जमावाचे हल्ले, हिंसाचार, आंदोलन आणि शस्त्रास्त्रांची लुटालूट असे प्रकार वाढल्यामुळे सरकारकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जमावाकडून लुटण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये एके-47, इंसास रायफल, हँड गन, मोर्टार, कार्बाईन, हँडग्रेनेड आणि बॉम्ब यांचा समावेश आहे. राज्यातील केवळ खोऱ्यातील पोलीस ठाण्यांमध्येच नव्हे, तर डोंगराळ जिल्ह्यांमध्येही लूट झाल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे. पोलीस सूत्रांकडूनच मिळालेल्या या माहितीनुसार हिंसाचाराची व्याप्ती वाढलेली दिसत आहे. जमावाने पळवलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी सुरक्षा दल डोंगरी भाग आणि खोऱ्यात सतत शोधमोहीम राबवत आहे. डोंगरी जिल्ह्यातून आतापर्यंत 138 शस्त्रे आणि 121 हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. तर खोऱ्यातील जिल्ह्यातून 1057 शस्त्रेजप्त करण्यात आली आहेत.









