कृष्णात चौगले, कोल्हापूर
प्राथमिक दुध संस्थांनी 1 जानेवारी 2023 पासून दुध संकलन करण्यासाठी 100 मिलीऐवजी 10 मिली अचुकतेच्या (अॅक्युरसी) वजनकाट्यांचा वापर करावा, असे आदेश वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले होते. या आदेशाची वैधमापनशास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक आर.एन.गायकवाड यांच्याकडून युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार जिह्यातील 20 संस्थांवर दंडात्मक कारवाई करून 100 मिली अचुकतेचे वजनकाटे जप्त करून त्यांना 10 मिलीचे वजनकाटे वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या दुध संस्थाकडून अद्यापही 10 मिलीचे वजनकाटे वापरले जात नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती केली असून धाडसत्र राबविले जाणार आहे. या कारवाईमुळे दुध संस्थांचे धाबे दणाणले आहेत.
दुध संकलनासाठी वापरले जाणारे वजनकाटे 100 मिली अचुकतेचे असल्यामुळे दुध उत्पादकांना वर्षानुवर्षे 99 मिलीपर्यंतचा भुर्दंड सहन करावा लागत होता. या विरोधात ‘तरूण भारत संवाद’ने वेळोवेळी उठविलेला आवाज आणि संभाजी ब्रिगेड संघटनेचा पाठपुरावा यामुळे वजनकाट्यांची अॅक्युसरी 10 मिली करावी असे आदेश वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये आदेश दिले होते. 1 जानेवारी 2023 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले होते. पण या आदेशाविरोधात गोकुळच्या काही कारभाऱ्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. पण हा विषय काबाडकष्ठ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काशी निगडीत असल्यामुळे तो आदेश रद्द न करता कायम ठेवला आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2023 पासून वैधमापनशास्त्र विभागाच्या पथकामार्फत संस्थांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील बहुतांशी संस्थांची तपासणी झाली असून त्यामधील वीसहून अधिक संस्थांवर दंडात्मक कारवाई करून 100 मिली अचूकतेचे वजनकाटे जप्त केले आहेत.
जिह्यातील सर्वच दुध संघांच्या प्राथमिक दूध संस्थामध्ये उत्पादकांचे दूध इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारे घेतले जाते. यामधील बहुतांशी संस्था चालकांकडून वजन काट्यामध्ये फेरफार करून प्रतिलिटर सुमारे 50 ते 150 मि.लीचे मापात पाप केले जात असून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जातो. ग्रामीण अर्थकारण दुग्ध व्यवसायावर अवलंबून असताना दिवसेंदिवस मिळकतीपेक्षा खर्च वाढल्यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीस आला आहे. वाढत चाललेल्या पशुखाद्यांच्या दरामुळे दूध उत्पादकांच्या जमाखर्चाचा ताळमेळ बिघडत चालला आहे. तर दूसरीकडे संस्था चालकांकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामध्ये फेरबदल करून दूध उत्पादकांना लुटले जात आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेला दूध उत्पादक शेतकरी संस्थाचालकांच्या गैरकारभारामुळे अर्थिक कोंडीत सापडला आहे.
जिह्यातील सर्वच दूध संघांकडून त्यांच्या प्राथमिक दूध संस्थांकडून केला जाणारा काळाबाजार रोखण्यासाठी कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे अनेक संस्थाकडून काटामारी केली जात आहे. वैधमापन शास्त्र विभागाकडून या वजन काट्यांची वर्षातून एकदा पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर दरम्यानच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये संस्थाचालकांकडून वजन काट्यामध्ये फेरफार केला जातो. यामध्ये बहुतांशी प्राथमिक दूध संस्थामध्ये लिटरमागे सुमारे 50 ते 150 मिलीचे मापात माप केले जाते. जिह्यातील अनेक दूध संस्थांतील दूध उत्पादकांनी लिटरच्या प्रमाणित मापामध्ये दूध मोजून त्याचे दूध संस्थामधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामध्ये वजन केल्यानंतर त्यामध्ये 50 ते 100 मिलीची तूट आढळून आली. याबाबत वैधमापनशास्त्र कार्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काटामारी रोखण्यासाठी वजनकाटे 100 मिलीऐवजी 10 मिली अॅक्युरसीचे करावेत अशी मागणा काही शेतकरी संघटनांसह संभाजी ब्रिगेडच्यावतीने केली होती. त्यानुसार वैधमापनशास्त्रचे सहाय्यक नियंत्रक आर.एन.गायकवाड यांनी त्याबाबतचा प्रस्ताव वैधमापनशास्त्र नियंत्रकांकडे पाठवला होता आणि आदेशदेखील झाला. अखरे 1 जानेवारीपासून आदेशाची अंमलबजावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
‘वैधमापन’ आणि ‘तरूण भारत संवाद’चे आभार
जिह्यातील सर्व दुध संस्थांचे वजनकाटे हे 100 मिली अचुकतेचे आहेत. परिणामी दुध संकलनादरम्यान वजन 100 मिली होईपर्यंत त्याचे मोजमाप निश्चित होत नाही. त्यामुळे एखाद्या उत्पादकाच्या दुधाचे वजन जरी 99 मिली झाले, तरीदेखील त्याचे वजन मोजमापात दिसून येत नाही. म्हणजेच त्या उत्पादकाचे 99 मिली दुध संस्थांच्या खात्यावर जमा होते. या अन्यायाविरोधात ‘तऊण भारत संवाद’ने वेळोवेळी वाचा फोडली. संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष ऊपेश पाटील यांनी त्याची दखल घेऊन त्याबाबत वैधमापनशास्त्र विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीच्या अहवालामध्ये 100 मिली अॅक्युरसीमुळे उत्पादकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वैधमापनशास्त्र विभागाने दुध संस्थांचे वजनकाटे 1 जानेवारीपासून 10 मिली अॅक्युरसीचे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे एखाद्या उत्पादकाच्या दुधाचे वजन 11 मिली झाले तरी ते वजनकाट्यावर दिसणार आहे. त्यामुळे ‘तरूण भारत संवाद’चे प्रस्तुत प्रतिनिधी आणि वैधमापनशास्त्र विभागाचें आभार मानतो.
विशाल सरदार पाटील, दुध उत्पादक शेतकरी (सावर्डे तर्फ असंडोली)
त्या संस्थांवर होणार दंडात्मक कारवाई
वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशाची 1 जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. वैधमापन निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नियुक्ती केली असून युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक संस्थांची तपासणी करून 100 मिली अचुकतेचे वजनकाटे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे जिह्यातील ज्या संस्था अद्यापही 100 मिलीचे वजनकाटे वापरत आहेत, त्यांनी तत्काळ 10 मिलीचे वजनकाटे घ्यावेत, अन्यथा संबंधित संस्थांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
आर.एन.गायकवाड, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









