वृत्तसंस्था / भुवनेश्वर
चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील ओडिशाच्या 13 खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे प्रोत्साहन मानधन राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. स्पर्धेची तयारी करण्यासाठी हा निधी दिला जाईल. आहार, प्रशिक्षण आदी बाबींसाठी या निधीचा उपयोग खेळाडूंकडून होणार आहे. किशोर जेना, अंशिका भारती, रितू कौडी, सोनाली स्वेन, अनुपमा स्वेन, नेहादेवी, प्यारी झाझा, दीप ग्रेस एक्का, अमित रोहिदास, दुमुनी मरांडी, तरुलता नाईक, मामा नाईक आणि हुपी माझी आदी खेळाडूंची निवड आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. हे खेळाडू या स्पर्धेत त्यांच्या असामान्य कौशल्याचे प्रदर्शन करुन राज्याची आणि देशाची कीर्ती वाढवतील, असा विश्वास ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.









