वृत्तसंस्था/ राऊरकेला
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राष्ट्रीय संघातून खेळणारे ओडिशाचे दोन हॉकीपटू अमित रोहिदास व निलम संजीप झेस यांना 10 लाख रुपये देण्याचे घोषित केले. दोन्ही खेळाडू शुक्रवारपासून सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघातून खेळत आहेत.

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते, त्या संघाचाही अमित रोहिदास सदस्य होता. विश्वचषक स्पर्धेत तो संघाचा उपकर्णधार असून त्याने आतापर्यंत 125 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र या डिफेंडरचा पेनल्टी कॉर्नर्सच्या वेळी पर्यायी खेळाडू म्हणून वापर केला जातो. त्यामुळे पेनल्टी कॉर्नर्सवर त्याच्या नावे केवळ 18 आंतरराष्ट्रीय गोलांची नोंद आहे. संघातून वारंवार आत-बाहेर होणाऱया या खेळाडूने हळूहळू प्रगती करीत उपकर्णधार होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याने 2013 मध्ये वरिष्ठ संघात पदार्पण केले. पण बचावफळीतील आधारस्तंभ होण्यासाठी त्याला काही कालावधी लागला. निलम संजीप झेसने 30 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याच्या नावावर पाच गोल नोंद आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी हॉकी संघाची भेट घेऊन, जेतेपद मिळविल्यास प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याची पुन्हा एकदा हमी दिली.









