घरात सापडलेल्या पैशाला हिशेब देण्यास टाळाटाळ, कारागृहात रवानगी
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयाकडून 2 लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱयांनी रंगेहात पकडलेल्या कित्तूर येथील तहसीलदाराच्या घरात तपासणीच्यावेळी 10 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम कोठून आली? यासंबंधी उत्तर देण्यास तहसीलदाराने टाळाटाळ केली आहे.

तहसीलदार सोमलिंगाप्पा हलगी (वय 42) व भू-सुधारणा विभागाचे अधिकारी प्रसन्ना जी. (वय 32) यांना लोकायुक्त विभागाचे पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर व त्यांच्या सहकाऱयांनी दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
खोदानपूर (ता. कित्तूर) येथील राजेंद्र इनामदार या शेतकऱयांच्या 10 एकर जमिनीची नोंद करण्यासाठी 5 लाख रुपये लाच मागितली होती. 2 लाख रुपये स्वीकारताना तहसीलदारच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री अचानक छापा टाकून तहसीलदारसह दोघा जणांना अटक केली आहे.
सोमलिंगाप्पा व प्रसन्न यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शुक्रवारी रात्री अधिकाऱयांनी तहसीलदारच्या घरात तपासणी केली असता 10 लाख 40 हजार रुपये मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
तक्रारदारांच्या वडिलांचे निधन
कित्तूर तहसीलदारसह दोघा जणांविरूध्द लोकायुक्तांकडे तक्रार करणाऱया राजेंद्र इनामदार (रा. खोदानपूर) यांच्या वृद्ध वडिलांचे हृदयाघाताने निधन झाले आहे. राजेंद यांनी दिलेल्या तक्रारीमुळे दोघा जणांना रंगेहात पकडण्यात आले.









