खासगी कोचमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग : मदुराई रेल्वेस्थानक परिसरात दुर्घटना
वृत्तसंस्था/ मदुराई
तामिळनाडूच्या मदुराई रेल्वेस्थानकावर शनिवारी पहाटे रेल्वेच्या डब्यात आग लागली. या अपघातात किमान 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य 20 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदेशीरपणे वाहतूक केलेल्या गॅस सिलिंडरमुळे हा अपघात झाल्याचे दक्षिण रेल्वेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

सिलिंडर स्फोटाची दुर्घटना घडलेला रेल्वे कोच एका व्यक्तीने खासगी तत्वावर बुक केला होता. काही भाविकांना तामिळनाडूमधील पर्यटन आणि धार्मिक स्थळी नेत असताना रेल्वेमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. सदर प्रवासी उत्तर प्रदेशातील लखनौहून मदुराईला पोहोचले होते. रेल्वे प्रवाशांनी डब्यात अवैधरित्या गॅस सिलिंडर आणल्यामुळे ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अनेक प्रवासी डब्यातून बाहेर पडले. तर काही प्रवासी फलाटावरच उतरले. सिलिंडरशेजारी असलेले काही प्रवासी आगीच्या विळख्यात सापडल्याने मृत्युमुखी पडले. तर काहीजण गंभीररित्या होरपळले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी डब्यातून मृतदेह बाहेर काढले.
प्राथमिक माहितीनुसार, पुनालूर मदुराई एक्स्प्रेस ही रेल्वे रामेश्वरमला जात होती. आग लागलेल्या डब्यातील बहुतांश प्रवासी लखनौला चढले होते. मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक उत्तर प्रदेशातील आहेत. मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवण्यात आली असता पहाटे 5.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. सकाळी साडेसात वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. स्फोटामुळे केवळ एका कोचला आग लागली. वेळीच उपाययोजना केल्याने अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
डब्यातील प्रवाशांनी 17 ऑगस्ट रोजी लखनौ येथून प्रवास सुरू केला होता. 27 ऑगस्ट रोजी ते चेन्नईला जाणार होते. चेन्नईहून लखनौला परतण्याचा त्यांचा विचार होता. घटनास्थळी पडलेल्या वस्तूंमध्ये एक सिलिंडर आणि बटाट्याची पोती आढळून आली. यावरून डब्यात अन्न शिजवले जात असल्याचे दिसून आले. शनिवारी पहाटे त्यांनी कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता सिलिंडरचा स्फोट झाला, असे मदुराईचे जिल्हाधिकारी एमएस संगीता यांनी सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाख ऊपयांची मदत जाहीर केली आहे.
नियम काय सांगतो?
नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती आयआरसीटीसी पोर्टलचा वापर करून खासगी स्वरुपात एखादा कोच बुक करू शकते, परंतु त्याला डब्यात गॅस सिलिंडर किंवा कोणतीही ज्वलनशील सामग्री ठेवण्याची परवानगी नसते. सदर कोचचा वापर फक्त प्रवाशांसाठी केला जाऊ शकतो. मात्र, येथे सिलिंडरसारख्या ज्वलनशील वस्तूची वाहतूक रेल्वे कोचमधून करण्यात आल्याने मोठी दुर्घटना घडली.









