वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर या जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस एका वाहनावर आदळून हा अपघात रविवारी झाला. अपघाताचे वृत्त कळताच जिल्ह्याच्या वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित साहाय्यता कार्याचा प्रारंभ केला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात बस आणि ती आदळलेले वाहन या दोन्हीमधील प्रवासी ठार झाले आहेत. वाहनातील प्रवासी गाझियाबाद येथील एका कंपनीत कामाला होते. ते अलिगढ येथे आपल्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी जात होते. तथापि, त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेसंबंधात दु:ख व्यक्त केले असून प्रशासनाला पुढील आदेश दिले आहेत.









