नागरिकांत कुतूहल, मत्स्य खात्याची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या किल्ला तलावात शनिवारी तब्बल 10 किलोचा मासा सापडला आहे. याबाबत सर्वत्र कुतूहल निर्माण झाले आहे. शिवाय दिवसभरात 300 किलो मासे पकडण्यात आले आहेत. साधारण दीड फूट रुंद आणि तीन फूट लांबीचा हा मासा असल्याची माहिती मत्स्य खात्याने दिली आहे.
मत्स्य खात्यामार्फत जिल्ह्यातील विविध जलाशय आणि तलावांमध्ये मत्स्य बीज सोडण्यात आले होते. त्यांची आता पूर्ण वाढ झाली असून विक्रीसाठी ते बाहेर काढले जात आहेत. दरम्यान शनिवारी मासेमारी करताना तब्बल 10 किलो वजनाचा मासा गळाला लागला आहे. यंदा जिल्ह्यात सात हजार टनाहून अधिक मत्स्य उत्पादन झाले आहे. गतवर्षी समाधानकारक झालेल्या पावसामुळे मत्स्य उत्पादनात चार हजार टनांची वाढ झाली आहे. किल्ला तलावात 1 लाख मत्स्यबीज सोडले होते. शनिवारी मासेमारी दरम्यान काही मोठे मासे गळाला लागले आहेत. त्यामध्ये 8 ते 10 किलो वजनाच्या माशांचा समावेश आहे. 10 किलोचा मासा सापडल्याने याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.









