जनरेटरच्या तारेमुळे वाहनातील भाविक होरपळले
वृत्तसंस्था/ कूचबिहार
पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये पिकअप व्हॅनचा विजेच्या वाहिनीशी संपर्क झाल्याने 10 भाविकांचा (कांवडी) मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री उशिरा मेखलीगंजनजीक घडली आहे.

27 भाविक पिकअप व्हॅनमधून जलपेश येथील शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जात होते. पिकअप व्हॅनच्या मागे डीजे वाजत होता. जनरेटच्या तारेत शॉर्टसर्किट झाल्याने पिकअपमध्ये बसलेल्या भाविकांना विजेचा धक्का बसला होता. पिकअपमध्ये विजेचा धक्का बसताच चालकाने पळ काढला. सीताकुची पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले आहे.
या दुर्घटनेत 10 भाविकांचा लगेच मृत्यू झाला. हे सर्वजण एक-एक करून पिकअपमधून खाली कोसळले. लोकांना काही समजेपर्यंत ही दुर्घटना घडली होती. दुर्घटनेतील सर्व पीडित सीतलकुची येथील रहिवासी आहेत. संबंधित चालकाचा शोध घेतला असून दुर्घटनेचे कारण त्याच्या चौकशीतून समजू शकणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित वर्मा यांनी म्हटले आहे.









