जीसुडा’कडून पत्र : पालिका बैठकीत माहिती, छताची दुरुस्ती व रंगकाम तातडीने हाती घेण्याचा ठराव
मडगाव : मडगाव पालिका इमारतीची डागडुजी करण्यासाठी 10 कोटी ऊपये लागणार असल्याचे पत्र ‘जीसुडा’ने दिले असल्याने मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी शुक्रवारी झालेल्या मडगाव पालिका मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत नजरेस आणून दिले. यासाठी निर्णय घेणे बाकी असून आम्हाला पालिकेच्या छताची दुरूस्ती हाती घ्यावी लागेल. नाही तर येत्या पावसाळ्यात पडझड होण्याची शक्यता आहे, याकडे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी लक्ष वेधले. पालिकेच्या वारसा इमारतीची परिस्थिती पाहिल्यास गेली दोन वर्षे रया गेली आहे. जीसुडाने व सरकारने वेळकाढूपणा केलेला आहे, अशी टीका नगरसेवक सगुण नाईक यांनी केली व तातडीने छताची डागडुजी व रंगकाम हाती घेण्याची सूचना केली असता तसा ठराव घेण्यात आला.
नुकताच कोलमोरोड येथील रस्त्यासंदर्भात उच्च न्यायालयात असलेला खटला मडगाव पालिकेने जिंकला. या प्रकरणी न्यायालयाने मडगाव पालिकेला जमा करण्यास लावलेले 2 कोटी 73 लाख सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याचा अनुपालन अहवाल सादर केल्यानंतर काढण्याची अनुमती दिलेली आहे. त्याबद्दल नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला व नगरसेवक सदानंद नाईक यांनी त्यास अनुमोदन दिले. यातून मुख्याधिकाऱ्यांना जास्त श्रेय देण्याचे प्रयत्न केले गेले असताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी याचे श्रेय सर्वांना जाते, असे सांगितले. जास्त श्रेय वकील पराग राव यांना जाते. त्यासह पालिका प्रशासन आणि पालिका मंडळालाही हे श्रेय जात असल्याचे त्यांनी सांगितले. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पालिकेच्या विविध क्षेत्रांत रोषणाईची कामे ‘जीसुडा’कडून करून घेण्यासाठी जे प्रस्ताव सूचित केले होते त्यांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.









