अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक, मोठ्या परताव्याचे आमिष
गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एस. एम. ग्लोबल फंडाचे नागरिकांच्या लुबाडणुकीचे प्रकरण गेल्या 6 महिन्यांपासून तालुक्यात गाजत आहे. या कंपनीत तालुक्यातील अधिकारीवर्गासह सर्वसामान्य नागरिकांनी सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची व त्यांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती चर्चेतून पुढे येत असल्याचे ॲड. यश घोसाळकर यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, या घोटाळ्यापकरणी येथील ॲड. घोसाळकर यांनी येथील पोलिसात मंगळवारी आठ जणांविरोधात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीतील माहितीनुसार, ॲड. घोसाळकर यांच्याशी नीलेश पोटसुरे यांनी संपर्क साधून आपण एस. एम. ग्लोबल या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी पैसे द्या, त्यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल, असे सांगितले व सतत 4 वर्षे फिर्यादीकडे पाठपुरावा केला. 19 मे 2020 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास नीलेश पोटसुरे, मयुर मंडलिक, प्रवीण कदम, योगेश पवार, विशाल साळवी, परेश वणे, नीलेश रक्ते यांनी फिर्यादीच्या दुकानात कंपनीच्या एस. स्मार्ट योजनेबाबत माहिती दिली. या योजनेत 10 रुपये गुंतवले तर 3 ते 4 महिन्यात 15 रुपये परतावा मिळणार आहे, अशी माहिती दिली. मात्र ही माहिती मला नीट समजली नाही, असे फिर्यादीने सांगितले. तेव्हा पोटसुरे यांनी स्वतच्या बायकोच्या नावाने या योजनेत असलेल्या गुंतवणुकीचे प्रमाणपत्र व त्यातून मिळालेल्या पैशाची बँकेची स्टेटमेंट दाखवली. मात्र त्यातही फिर्यादीने रस न दाखवल्याने त्यांनी आम्ही इकडेचच आहोत, कोठेही पळून जाणार नाही, तुम्हाला ज्यावेळी पैसे लागतील त्यावेळी पैसे घेऊन जा, त्यासाठी पैसे परताव्याची खात्री हवी असल्यास दिलेल्या पैशाची नोटरी करुन रक्कमेचे चेकही देऊ, असे सांगितले व विविध प्रलोभने दाखवून योजनेत पैसे गुंतवण्यासाठी फिर्यादीला प्रवृत्त करु लागले.
एस. एम. ग्लोबल कंपनीचे मालक मिलिंद गाढवे आहेत. या योजनेत 10 रुपये गुंतवलेत तर 20 रुपयांचा परतावा मिळेल. या गुंतवणुकीनंतर आमच्या मदतीने तुम्हाला गुंतवणूक प्रमाणपत्र, नोटरी, चेकची प्रत व गुंतवलेल्या रक्कमेइतक्या मिळकतीची कागदपत्रे देण्यात येतील, तेव्हा तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक कराच, असे सांगण्यात आले. तुम्ही हे पैसे आम्हांला आमची गरज भागवण्यासाठी देत आहात व आम्हाला पैसे मिळाले की तुमचे घेतलेले पैसे आम्ही परत करू, असे सांगत गुंतवणुकीसंर्दभात महाड, दापोली व गोवा येथे वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार आयोजित करुन माहिती देत होते. 15 सप्टेंबर 2021 रोजी नीलेश पोटसुरे हे घरी आले होते तेव्हा त्यांनी रोख रक्कम रुपये 3 लाख 47 हजार रुपये आपल्याकडून घेतले. तसेच योगेश पवार, नीलेश पोटसुरे, प्रवीण कदम व मयूर मंडलिक यांनी वेळोवेळी भेटून त्यांनी दिलेल्या सांगलीतील ॲक्सीस बँकेतील खाते क्रमांक 921020036614833 यावर कंपनीच्या नावे माझ्या बँक ऑफ इंडियातील खात्यातून 1 ऑक्टोबर 2021 रोजी 2 लाख 23 हजार रुपये तसेच त्याचदिवशी एन.एफ.टी.द्वारे 2 लाख 73 हजार 10 रुपये पाठवले. तसेच बँक ऑफ इंडियाच्या लाटवण शाखेतून 1 नोव्हेंबर 2021 रोजी 7 लाख रुपये, 22 डिसेंबर 2021 रोजी 72 हजार रुपये असे एकूण 16 लाख 15 हजार 20 रुपये माझ्याकडून स्वतची गुंतवणूक करण्यासाठी मागून घेतले. यानंतर 23 जानेवारी 2022 रोजी मंडणगड येथील दिनेश सापटे यांच्या घरी बैठक घेण्यात आली. यावेळी या कंपनीचे अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते. बैठकीत मी कंपनीस दिलेल्या पैशाच्या परताव्याबाबत मयुर मंडलिक यांना विचारणा केली असता त्यांनी तुमच्याकडून घेतलेल्या पैशाशी आमचा संबंध नाही, असे सांगितले. तसेच आमच्या नादी लागू नका, तुमचे पैसे प्रियांका मिलिंद गाढवे व रवींद्र बाळासो गाढवे, अविनाश बाळासाहेब पाटील (सर्व रा. सांगली) व संतोष पवार (रा. पुणे) या व्यक्ती तुम्हाला पैसे देतील. मी तुम्हाला ओळखत नाही. त्यामुळे माझ्याशी संपर्क करु नका, असे सांगितले. त्यामुळे 19 मे 2020 ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत माझी भेट घेऊन एस.एम. ग्लोबल कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यासाठी आमिष व प्रलोभने दाखवत माझी व साक्षीदार असलेल्या व्यक्तीची एकूण सुमारे 60 लाख 15 हजार 20 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
त्यानुसार भा.दं.वि. कलम 420 व 34 अन्वये संबंधितांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यश घोसाळकर यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार त्यांच्यासमवेत श्रीकांत जाधव 8 लाख रुपये, विशाल जाधव 6 लाख रुपये, काशीनाथ बने 14 लाख रुपये, लक्ष्मण पांगरे 2 लाख रुपये, प्रशांत कोकाटे 7 लाख रूपये, मंदार वाईकर यांनीही 7 लाख रुपये अशी या कंपनीत गुंतवणूक केली असून त्यांचीही फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे.
फसवणुकीचा आकडा 5 ते 10 कोटीचा?
या योजनेत तालुक्यातील अधिकारीवर्गासह सर्वसामान्य नागरिकांची सुमारे 5 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याची माहिती चर्चेतून पुढे येत आहे. ॲड. यश घोसाळकर यांनी तक्रार केल्यानंतर आमचीही अशाचप्रकारे फसवणूक झाल्याची कैफियत मांडत तक्रारदार पुढे आल्याची माहिती घोसाळकर यांनी पत्रकारांना दिली