बिडी येथे भूमिपूजन कार्यक्रम थाटात : सोसायटींच्या सभासदांची मोठी उपस्थिती
वार्ताहर/नंदगड
खानापूर तालुक्यातील 41 कृषी पत्तीन सोसायटींच्या हद्दीत शेतकरी भवन बांधण्यासाठी 10 कोटी 25 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बिडी येथे दिली. यासाठी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व आपल्या पत्राद्वारे सरकारकडे निधीसाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वरील निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कृषी पत्तीन सोसायटीचे शेतकरी भवन उभे राहण्यास सुलभ झाले आहे. त्याचा लाभ खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आमदार हलगेकर यांनी केले. बिडी येथील कृषी पत्तीनच्या आवारात सर्वच सोसायटींचा भूमिपूजनाचा सांकेतिक कार्यक्रम एकाच ठिकाणी करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष काशिलकर होते.
खानापूर तालुक्यातील घोटगाळी, चिक्कमुन्नवळी, हलशी (पूर्व), गंदीगवाड, गुंजी, बेकवाड, हिरेमुनवळ्ळी, हेब्बाळ, निलावडे, निट्टूर, बिडी, गर्लगुंजी, चिकहट्टीहोळी, जांबोटी-निलावडे, कारलगा, पारिश्वाड, देवलती, तोपिनकट्टी, हिरेअंग्रोळी, मंग्यानकोप, कसमळगी, नंजिनकोडल, कामशिनकोप, लिंगनमठ, इटगी, हलकर्णी, नागुर्डा, हंदूर-हुलीकोत्तल, वाटले, करंबळ, गांधीनगर (हलकर्णी), बिजगर्णी, भुरूणकी, पारवाड, कणकुंबी, चापगाव, शिंदोळी, तोलगी, खानापूर, तीर्थकुंडे, गोधोळी, इदलहोंड आदी कृषी पत्तीन संघांच्या शेतकरी भवनाचा समावेश असल्याची माहिती आमदार हलगेकर यांनी दिली.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी बोलताना म्हणाले, गेल्या वीस वर्षांपासून खानापूर तालुक्यातून एकमेव संचालक निवडून जात आहे. गेल्या 20 वर्षात त्यांनी कृषी पत्तीन सोसायटींचा विकास साधायला हवा होता. सभासदांची संख्या वाढवायला हवी होती. तालुक्यातील किमान 50 जणांना डीसीसी बँकेत नोकरीला लावायला हवे होते. परंतु तसे न झाल्याबद्दल आम्ही जनतेच्या कल्याणासाठी विद्यमान संचालकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी सभासदांनी व जनतेने सहकार्य करावे, असेही आवाहन केले. यावेळी राजू सिद्धाणी, भरमाणी पाटील, यशवंत बिर्जे, जी. व्ही. जवळी, किशोर मिठारी आदीनी विचार मांडले. कार्यक्रमाला बिडी, गर्लगुंजी, तोपिनकट्टीतील सभासद, शेतकरी उपस्थित होते.









