समाजकंटकांकडून प्रकार झाल्याने संताप : पोलिसांकडून पाहणी
बेळगाव : अतिवाड येथील मराठी प्राथमिक मराठी शाळेतील वर्गखोल्यांचे कुलूप तोडण्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री समाज कंटकांकडून हा प्रकार घडला असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काकती पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून, त्याची पाहणी करण्यात आली आहे. शाळेतील आवारात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या शाळेमध्ये सुमारे 10 वर्गखोल्या आहेत. त्या सर्व खोल्यांचे कुलूप मंगळवारी रात्री समाज कंटकांनी तोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कुलूप तोडल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. खोल्यांमधील साहित्याचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याची मागणी
ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी रात्री मराठी प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे कुलूप तोडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या समाजकंटकांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे. यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष भरमा व्हरकेरी, सदस्य मल्लाप्पा पाटील, वनिता मण्णूरकर, विजय पाटील, मुख्याध्यापक बी. एल. मजुकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष भरमू बेळगावकर, संजय मास्तोळी आदींनी शाळेला भेट दिली.









