रणजी चषक स्पर्धेत गुजरातचा कर्नाटकवर 6 धावांनी विजय : सामनावीर सिद्धार्थ देसाईचे 42 धावांत 7 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातने कर्नाटकचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. एलिट गट क मधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकण्यासाठी कर्नाटकसमोर अवघ्या 109 धावांचे लक्ष्य होते, पण कर्नाटकाचा संघ अवघ्या 103 धावांवर गारद झाला. 109 धावांचा पाठलाग करताना कर्नाटकने बिनबाद 50 धावा केल्या होत्या, पण सिद्धार्थ देसाईच्या भेदक माऱ्यासमोर बिनबाद 50 वरुन कर्नाटकचा संपूर्ण डाव 103 धावांवर आटोपला. गुजरातने हा सामना 6 धावांनी जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
प्रारंभी, या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने पहिल्या डावात क्षितिज पटेल (95) आणि उमंग कुमार (72) यांच्या खेळीमुळे 264 धावा केल्या. कर्नाटककडून वासुकी कौशिकने 4 तर प्रसिध कृष्णा, रोहित कुमार, शुभांग हेगडे आणि विजयकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युतरात कर्नाटकाकडून सलामीवीर आर समर्थ (72) आणि कर्णधार मयंक अगरवाल यांनी कर्नाटकला दमदार सुरुवात करून दिली. अगरवालने अवघ्या 124 चेंडूंत 17 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कलने 42 धावांची तर अनुभवी फलंदाज मनीष पांडेने 88 धावांची खेळी केली. यामुळे कर्नाटक संघाला पहिल्या डावात 374 धावा करण्यात यश आले. पहिल्या डावाच्या आधारे कर्नाटककडे 110 धावांची आघाडी होती.
दुसऱ्या डावात कर्नाटकचे लोटांगण
दुसऱ्या डावात गुजरातचा संघ विशेष काही करु शकला नाही. संघाच्या 4 विकेट केवळ 52 धावांत पडल्या. यानंतर मनन हिंगराजिया (56) आणि क्षितिज पटेल (26) यांनी डाव सांभाळला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. तर उमंग कुमारने (56) सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. गुजरातचा दुसरा डाव केवळ 219 धावांवर सर्वबाद झाला. यामुळे कर्नाटकला केवळ 109 धावांचे लक्ष्य मिळाले.
बलाढ्या कर्नाटककडे पाहता त्यांना हे आव्हान सहज शक्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने 9.2 षटकात 50 सहज धावा केल्या होत्या. पण त्यानंतर सिद्धार्थ देसाईने जादू दाखवली. डावखुरा फिरकीपटू देसाईने 42 धावांत 7 बळी घेतले. देसाईला रिंकेश वाघेलाने सुरेख साथ दिली. वाघेलाने 3 बळी घेतले. अशाप्रकारे कर्नाटकचा संपूर्ण संघ अवघ्या 103 धावांत ऑलआऊट झाला. अवघ्या सहा धावांनी सामना जिंकत गुजरातने शानदार विजयाची नोंद केली. पहिल्या डावात 2 व दुसऱ्या डावात सात बळी घेणाऱ्या गुजरातच्या सिद्धार्थ देसाईला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
मुंबईचा आंध्र प्रदेशवर 10 गडी राखून दणदणीत विजय
मुंबई : रणजी करंडक स्पर्धेतील अन्य एका सामन्यात मुंबईने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबईने आंध्र प्रदेशचा 10 गडी राखून पराभव केला. मुंबईने पहिल्या डावात 395 धावा केल्यानंतर आंध्र प्रदेशचा डाव 184 धावांत आटोपला होता. मुंबईने आंध्राला फॉलोऑन दिल्यानंतरही दुसऱ्या डावात आंध्राच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. शैकी रशीद (66) व हनुमा विहारी (46) वगळता इतर खेळाडूंनी हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांचा दुसरा डाव 244 धावांवर आटोपला व मुंबईल विजयासाठी केवळ 34 धावांचे लक्ष्य मिळाले. मुंबईने हे लक्ष्य 8.4 षटकांत पूर्ण करत शानदार विजय मिळवला. दोन्ही डावात 10 बळी मिळवणाऱ्या मुंबईच्या शाम्स मुलाणीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र-झारखंड सामना अनिर्णीत
पुणे : येथील गहुंजे मैदानावर झालेल्या रणजी चषक स्पर्धेत महाराष्ट्र व झारखंड सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. प्रथम फलंदाजी करताना झारखंडने पहिल्या डावात 403 धावा केल्या. यानंतर पवन शाह, केदार जाधव व अंकित बावणे यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. यानंतर झारखंडने दुसऱ्या डावात खेळताना 2 बाद 167 धावा केल्या. अखेरीस हा सामना अनिर्णीत झाल्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राला चार गुण मिळाले.









