आरोग्य खात्याने ठेवले ध्येय : सध्या 80 हजार जणांना डोस.सर्वांना बुस्टर डोस मोफत
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील सुमारे 10,50,000 लोकांना कोरोनाचा बुस्टर डोस देण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 80,000 लोकांना डोस दिल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. हा बुस्टर डोस मोफत असून गोव्यातील जास्तीत जास्त लोकांनी तो घ्यावा आणि त्यासाठी सर्व 40 आमदारांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. प्राथमिक व कम्युनिटी आरोग्य केंद्रात हा डोस उपलब्ध असून 30 सप्टेंबरपर्यंत त्यांची घेण्याची मुदत वाढवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर हा बुस्टर डोस आवश्यक असून 18 ते 60 वर्षे वयोगटातील कोणीही तो घेवू शकतो. कोरोनाच्या नंतर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा बुस्टर डोस आवश्यक असून तो घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत म्हणून त्याकरीता जनजागृती होणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका महिला- बालविकास खाते व इतर खात्यांना या जागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असून सर्वांनी सहकार्य केले तर हे ध्येय पूर्ण करता येणे शक्य आहे असे मंत्र्यांनी बोलून दाखवले.
सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे
खासगी संस्था-संघटना, पालिका-पंचायती यांनी देखील या मोहिमेत हातभार लावण्याची गरज असून नगरसेवक, पंच यांनी आपापल्या भागात या डोससाठी जनजागृती करावी आणि लोकांना डोस घेण्यासाठी पुढे आणावे. केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच भाजप या डोसची देखरेख करीत असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. गोवा लहान राज्य असल्याने हे ध्येय साध्य करणे सहज शक्य आहे. फक्त सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे राणे म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱया डोसनंतर 9 महिने संपले की हा बुस्टर डोस घेण्याची मुदत होती ती आता 6 महिने करण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. येत्या 5 ऑगस्टला पुन्हा एकदा सर्व संबंधितांची बैठक घेऊन बुस्टर डोसचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्यातील 40 आमदारांना जनजागृतीसाठी पत्रे पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.