सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ः हरियाणातील प्रकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणाच्या फरिदाबाद जिल्हय़ातील खोरी गावात वनभूमीवर वसलेल्या सुमारे 10 हजार लोकांना जागा रिकामी करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने खोरी गावातील वनभूमीवर उभारण्यात आलेली घरे हटविण्याचा निर्देश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फरिदाबाद पोलिसांना याकरता 6 आठवडय़ांची मुदत दिली आहे. प्रशासनाने वनभूमी अतिक्रमणापासून मुक्त करावी. गरज भासल्यास पोलिसांची मदत घेण्या यावी असे सर्वोच्च न्यायालयाकडून म्हटले गेले आहे.
वनभूमीसंबंधी कुठल्याच प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधी उच्च न्यायालयाकडून यापूर्वीच आदेश देण्यात आला आहे.
यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून भूमीवरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाला असता मोठा वाद निर्माण झाला होता. वनभूमीवर राहत असलेल्या लोकांकडून नोटीसशिवाय ही कारवाई सुरू असल्याचे म्हटले गेले होते. संबंधित जमीन खरेदी केली असून दीर्घकाळापासून येथे राहत असल्याचे संबंधित लोकांचे सांगणे आहे.









