भगवान रामाची नगरी अयोधय सध्या विकासाची नवी गाथा रचत आहे. पूर्ण अयोध्येत विकासकामे केली जात आहेत. परंतु आता अयोध्येच्या नव्या मॉडेल अंतर्गत याच्या पौराणिक इतिहासाला दर्शविण्यासह यात मिनी भारताची झलकही दिसून येणार आहे. राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाल्यावर आता नव्या अयोध्येचे व्हिजन 2047 अंमलात आणले जात आहे. या पूर्ण प्रकल्पाला देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाशी जोडले जाईल. या प्रकल्पानुसार अयोध्येचे इतिहासकालीन महत्त्व कायम ठेवत लाखोंच्या संख्येत येणाऱया भाविकांसाठी नव्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्या या प्राचीन नगरीचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरणार आहे.
अवधपुरी मम पुरी सुहावनि, दक्षिण दिश बह सरयू पावनि
हिंदू पौराणिक इतिहासात पवित्र सप्त पुरींमध्ये अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी) आणि द्वारकेला सामील करण्यात आले आहे. अथर्ववेदमध्ये अयोध्येला ईश्वराची नगरी म्हटले गेलेआणि याच्या संपन्नतेची तुलना स्वर्गाशीच करण्यात आली. स्कंदपुराणानुसार अयोध्या शब्द ‘अ’ कार ब्रह्मा, ‘य’ कार विष्णू आणि ‘ध’ कार रुद्राचे स्वरुप आहे. अयोध्या नगरीत अनेक महान योद्धे, ऋषी-मुनी आणि अवतारी पुरुष होऊन गेले आहेत. भगवान रामाने याच पवित्र भूमीत जन्म घेतला होता. जैन धारणेनुसार येथे आदिनाथ यांच्यासह 5 तीर्थकरांचा जन्म झाला होता. अयोध्येची गणना भारताच्या प्राचीन सप्तपुरींमध्ये पहिल्या स्थानावर करण्यात आली आहे. जैन परंपरेनुसार देखील 24 तीर्थकरांपैकी 22 इक्ष्वाकु वंशाचे होते.
अयोध्येची स्थापन

पवित्र शरयू नदीच्या तटावर वसलेली आहे अयोध्या. वाल्मिकी यांच्याकडून रचित रामायणानुसार सूर्याचे पुत्र वैवस्वत मनू महाराज यांच्याकडून अयोध्येची स्थापना करण्यात आली होती. माथुरांच्या इतिहासानुसार वैवस्वत सुमारे ख्रिस्तपूर्व 6673 साली झाले होते. ब्रह्मा यांचे पुत्र मरीचि यांच्यापासून कश्यम यांचा जन्म झाला, कश्यप यांच्याकडून विवस्वान आणि विवस्वान यांचे पुत्र वैवस्वत मनु होते. वैवस्वत मनु यांचे 10 पुत्र इल, इक्ष्वाकु, कुशनाम, अरिष्ट, धृष्ट, नरिष्यंत, करुष, महाबली, शर्यति आणि पृषध होते. यातील इक्ष्वाकु कुळाचाच अधिक विस्तार झाला. इक्ष्वाकु कुळातच पुढे भगवाम श्रीरामांनी अवतार घेतला. अयोध्येवर महाभारत काळापर्यंत याच वंशाच्या लोकांचे राज्य राहिले.
पुराणांमध्ये उल्लेख
तुलसीकृत रामचरित मानसच्या या चौपाईमध्ये भगवान श्रीराम यांच्या स्वतःच्या मातृभूमीबद्दलचे प्रेम आणि पतित पावन शरयूचा महिमा वर्णिला आहे. अयोध्या हे हिंदूंच्या प्राचीन आणि 7 पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. या रामनगरीत 10 हजार मंदिरे असून याला मंदिरांचे नगर म्हटले जाते. श्रीरामजन्मभूमीसह 84 कोसच्या अयोध्येत 200 अशी तीर्थस्थळे आहेत, जी ऐतिहासिक आहेत. तसेही मत्स्य पुराण, विष्णुपराणासह अनेक पुराणांमध्ये अयोध्येचा उल्लेख आहे, पण स्कंद पुराणात शरयू नदी, प्रमुख मंदिरे आणि कुंडाचा उल्लेख आढळून येतो.
स्वर्गासमान वैभव
अयोध्येला अथर्ववेदमध्ये ईशपुरी असे म्हटले गेले आहे. याच्या वैभवाची तुलना स्वर्गाशी करण्यात आली आहे. भगवान श्रीरामाचे जन्मस्थळ अयोध्या त्रेतायुगातील नगरी असल्याचे मानण्यात येते. पण सद्यकालीन अयोध्या राजा विक्रमादित्य यांनी वसविलेली 2000 वर्षे जुनी आहे. अयोध्येत दिवाळीचे वर्णन देखील वेद-पुराणांमध्ये आहे. प्रभू राम जेव्हा लंकाधिपति रावणाचा वध करून अयोध्येत दाखल झाले तेव्हा अयोध्या नगरीने त्यांचे स्वागत केले होते. घरोघरी दीप प्रज्वलित करण्यात आले आणि नगरीत उल्हास पसरला होता.
अयोध्येत 360 स्नानघाट
शरयू मंदिराचे महंत नेत्रजा प्रसाद मिश्र यांनी अयोध्येत 360 स्नानघाट असल्याची माहिती दिली आहे. या स्नानघाटांची माहिती स्कंद पुराणाच्या 22 व्या अध्यायात आहे. 10 हजार मंदिरांपैकी सर्वाधिक मंदिरे श्रीराम आणि सीतामातेची आहेत. सर्व तीर्थ अयोध्येत येऊन निवास करतात. अयोध्येच्या 100 हून अधिक कुंडांचे वर्णन देखील पुराणात आहे. यात मनु पासून सूर्य, भरत, सीता, हनुमान, विभीषण समवेत भगवानाशी संबंधित लोकांच्या नावाने कुंड देखील आहेत.
भगवान विष्णूच्या चक्रावर वसलेली नगरी
युगतुलसी पंडित रामकिंकर उपाध्याय यांच्या उत्तराधिकारी आणि रामायणम ट्रस्टच्या अध्यक्ष मंदाकिनी रामकिंकर यांनी अयोध्या ही जगातील पहिलीनगरी असल्याचे म्हटले. मानवेंद्र मनुचा जन्म अयोध्येतच झाला. ही अत्यंत प्राचीन नगरी असून याचे वर्णन वेद, पुराण इत्यादींमध्ये मोठय़ा प्रमाणात मिळते. अयोध्येचे वर्तमान मंदिर 200 ते 500 वर्षे जुने आहे. पण धर्मस्थळ लाखो वर्षांपूर्वीचे आहे. अयोध्या धनुष्याकृती असून हे भगवान विष्णूच्या चक्रावर वसलेले आहे. याच्या 9 द्वारांचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अर्पण अन् समर्पणाची अयोध्या
अयोध्या शब्द ऐकताच स्वतःच अर्थबोध होऊ लागतो, जेथे कुठलेच युद्ध झालेले नसेल, जेथील लोक युद्धप्रिय नसतील, जेथील लोक प्रेमप्रिय असतील, जेथे प्रेमाचे साम्राज्य असेल. श्रीरामप्रेमात न्हाऊन निघणारी नगरी अयोध्या आहे. या नगरीचे आणखी एक नाव अपराजिता आहे. या नगरीला कुणीच पराजित करू शकत नाही. ज्याला कुणीच जिंकू शकत नाही, किंवा जेथे आल्यावर जिंकण्याची इच्छाच संपेल. जेथे केवळ अर्पण किंवा समर्पण असेल ती अयोध्या असल्याचे रामकिंकर म्हणाले.
अयोध्या अन् फैजाबाद
कधीकधी अनेक लोकांमध्ये या दोन्ही शहरांबद्दल गेंधळ निर्माण होतो. सर्वसाधारणपणे या दोन्ही शहरांना लोक एकच शहर समजण्याची चूक करतात. अयोध्या हे भारताच्या प्राचीन नगरांपैकी एक असून कोटय़वधी भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांचे जन्मस्थळ आहे. तर फैजाबाद हे शहर अयोध्येपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. अवधच्या सुभेदाराने फैजाबादला राजधानी केले होते. पुढील काळात राजधानी लखनौमध्ये हलविण्यात आली होती आणि त्यानंतर फैजाबादचे पतन झाले होते. लखनौप्रमाणेच फैजाबादवरही नवाबांचा ठसा दिसून येतो.
हनुमानगढी मंदिर

अयोध्येत भगवान हनुमान सदैव असतात असे मानले जाते. याचमुळे अयोध्येत आल्यावर भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक हनुमानाचे दर्शन घेतात. येथील सर्वात प्रमुख श्री हनुमान मंदिर ‘हनुमानगढी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर राजद्वारच्या समोर उंच टेकडीवर स्थित आहे. भगवान हनुमान येथे एका गुहेत रहायचे आणि रामजन्मभूमी आणि रामकोटचे रक्षण करायचे असे बोलले जाते. हनुमानगढीला हनुमानजींचे घर देखील म्हटले जाते आणि हे मंदिर भगवान हनुमान यांना समर्पित आहे. तसेच श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱया भाविकाला प्रथम हनुमानगढीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. हनुमानगढीत छोटी दिपावलीपूर्वी मध्यरात्री संकटमोचनचा जन्मदिन साजरा करण्यात येतो. पवित्र नगरी अयोध्येत शरयू नदीमध्ये पापक्षालन करण्यापूवीं लोकांना भगवान हनुमानांची आज्ञा घ्यावी लागते.
हे मंदिर अयोध्येत एका उंचीच्या जागेवर असल्याने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 76 पायऱया चढाव्या लागतात. त्यानंतर पवनपुत्र हनुमान यांच्या मूर्तीचे दर्शन होते. मुख्य मंदिरात बाल हनुमानासह अंजनी मातेची मूर्ती आहे. या मंदिरात आल्याने मनोकामान पूर्ण होतात असे भाविकांची मानणे आहे.
या मंदिराच्या निर्मितीमागे एक कहाणी आहे. 10 व्या शतकाच्या मध्याला सुल्तान मंसूर अली हा लखनौ आणि फैजाबादचा शासक होता. सुल्तान अलीचा एकमात्र पुत्र आजारी पडला होता. त्याची प्रकृती अत्यंत बिघडल्याने सुल्तानने अखेरीस आंजनेय यांच्या चरणी ठेवले होते. तेथे प्रार्थना गेल्यावर सुल्तानाच्या पुत्राची प्रकृती सुधारू लागली. स्वतःच्या एकमात्र पुत्राचे प्राण वाचल्याने अवधचा नवाब मंसूर अलीने हनुमानगढी मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच ताम्रपत्रावर कधीच या मंदिरावर कुठलाही राजा किंवा शासकाचा कुठलाच अधिकार राहणार नाही तसेच येथील देणगीवर कुठलाच कर वसूल केला जाणार नसल्याची घोषणा केली होती. अयोध्येच्या सशस्त्र निर्वाणी अणीचे (सैन्य) महंत अभय रामदास यांच्या नेतृत्वात 18 व्या शतकात नागा साधूंनी हनुमानगढीला इस्लामिक शासकांपासून मुक्त केले होते.
या हनुमान मंदिराच्या निर्मितीशी संबंधित कुठलेच ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पण अयोध्येला अनेकदा वसवावे लागले पण एक ठिकाण नेहमीच स्वतःच्या मूळ स्वरुपात राहिले ते म्हणजे हनुमान टीला, जे आज हनुमानगढी नावाने प्रसिद्ध आहे. लंकेवर विजयाच्या प्रतीकाच्या स्वरुपात आणले गेलेले निशाण आजही या गढीत ठेवलेले असून ते विशेष क्षणी बाहेर काढले जातात आणि ठिकठिकाणी त्यांची पूजा करण्यात येते.









