मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सची माहिती -कोरोनाचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये 10,113 कंपन्या बंद झाल्या आहेत. सदरच्या कंपन्या या वैयक्तिक कारणास्तव बंद करण्यात आल्याचे समजते. ही स्थिती कोरोना आणि लॉकडाऊनच्या कारणास्तव उदभवल्याचे सांगण्यात येते. आर्थिक स्थिती बिघडल्याने कंपन्या बंद होत गेल्याची माहिती मिनिस्ट्री ऑफ कॉरर्पोरेट अफेयर्स (एमसीए) यांनी दिली आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या माहितीनुसार कंपनी कायदा 2013 च्या कलम 248(2) नुसार चालू आर्थिक वर्षात पेब्रुवारीपर्यंत संपूर्ण देशामध्ये 10,113 कंपन्या बंद झाल्या आहेत. कलम 248 च्या अधीन राहून सदर कंपन्यांनी स्वतःहून कंपनी बंद केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदरचे मंत्रालय हे व्यवसायातून बाहेर पडणाऱया कंपन्यांची कोणत्याही प्रकारची नेंदणी ठेवत नसून या कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभेतील एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मंत्रालयाकडे उपलब्ध असणाऱया अधिकच्या माहितीनुसार 2020 या आर्थिक वर्षात जवळपास 68,463 इतक्या कंपन्या बंद झाल्या आहेत.
नवीन कंपन्यांच्या नोंदणीत तेजी
आर्थिक वर्ष 2021 मध्ये नवीन कंपन्यांची नोंदणी ही जवळपास 20 टक्क्यांनी वाढली असून मंत्रालयाने मागील महिन्यात दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये जवळपास 1.13 लाखपेक्षा अधिकच्या कंपन्या नेंदणीकृत केल्या असल्याचे समजते.









