ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल 32.60 टक्के तर बारावीचा निकाल 18.8 टक्के इतका लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर आणि लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एएचसी व्होकेशनल या शाखांतील एकूण 69 हजार 542 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 69 हजार 274 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यापैकी 12 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 18.81 टक्के आहेे.
तर दहावाची प्रात्यक्षित परीक्षा 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर आणि लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत पार पडली. या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळांमधून 44,088 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 41,397 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 13,495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालाची टक्केवारी 32.60 इतकी आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 19,812 इतकी आहे.








