विजापूर पोलिसांची कारवाई : अनेक ठिकाणी घरफोडी केल्याचे स्पष्ट
वार्ताहर/ विजापूर
विविध ठिकाणच्या घरफोडीप्रकरणी विजापूर पोलिसांनी तिघांना अटक केले. यामध्ये दोघे चोरटे व तर अन्य एकजण चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा आहे. सदर कारवाई सोलापूर बायपासजवळ करण्यात आली. बंदगीसाब नालवतवाड (वय 19), भरत ठाकूर (वय 24, रा. हंचनाळ तांडा) व महावीर रामजी चव्हाण (वय 34, रा. आदर्शनगर, विजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 180 ग्रॅम सोने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने व एक कार असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, काही दिवसांपासून विजापूर शहरासह जिल्हय़ात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्याचे आव्हान विजापूर पोलिसांसमोर होते. त्यानुसार, याच्या तपासासाठी जिल्हा पोलीसप्रमुख प्रकाश निकम यांनी एका पथकाची नेमणूक केली होती. या पथकाकडून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, शनिवारी पहाटे बंदगीसाब नालवतवाड व भरत ठाकुर हे दोघे फिरत होते. त्यावेळी पथकातील अधिकाऱयांना त्यांचा संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीवेळी या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच चोरीतील मुद्देमाल महावीर चव्हाण याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महावीरलाही अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 180 ग्रॅम सोने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने व एक कार असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईत अतिरिक्त पोलीसप्रमुख डॉ. राम अरसिद्दी, पीएसआय के. सी. लक्ष्मीनारायण यांच्या नेतृत्त्वाखाली गोलघुमटचे सीपीआय जयवंत दुलारी, आदर्शनगरचे पीएसआय एस. बी. आजूर, एस. एस. मालेगांव, वाय. पी. कबाडे, सिद्धू दानपगोळ, संजय बनपट्टी, पुंडलिक बिरादार, महेश सालिकेरी आदींनी सहभाग घेतला होता. या घटनेची नोंद आदर्शनगर पोलीस स्थानकात झाली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.









