मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोना लीसींचे डोस अपुरे असल्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. मात्र, आज बोलताना राजेश टोपे यांनी 1 मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे. आम्ही सिरमला पत्र लिहिले होते. मे महिन्यात 13 ते 14 लाख लसीचे डोस देऊ, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे 4 ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज 18 लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीने 18 ते 44वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील, असे देखी त्यांच्याकडून सांगण्यात आले.
ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना दुसरा डोस द्यावाच लागेल. तो पूर्ण करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. तसेच लस उत्पादक कंपन्यांना 50 टक्के उत्पादन केंद्र सरकारला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आणि उरलेलं 50 टक्के राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. खूप मागणी या दोघांकडेही आली, तर कुणाला प्राधान्य देणार? याविषयी सरकारला नियंत्रण आणावं लागेल का? असाही प्रश्न निर्माण होतो, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.
Previous Articleलसीकरणात अडथळा आणल्याबद्दल ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल
Next Article दिल्ली : उपराज्यपाल अनिल बैजल यांना कोरोनाची लागण








