हमास आणि हिजबुल्ला अशा दोन आघाड्यांवर संघर्ष, नेतान्याहूंच्या लोकप्रियतेत वाढ
वृत्तसंस्था / जेरुसलेम
हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या निर्घृण हल्ल्याला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या हल्ल्यात 1,200 इस्रायली नागरीकांचा बळी घेण्यात आला होता आणि 200 हून अधिक नागरीकांचे अपहरण करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात चालविलेल्या युद्धालाही आज एक वर्ष पूर्ण होत असून इस्रायलच्या हल्यांमध्ये गाझा पट्टी उध्वस्त झाली असून किमान 40 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हमासचे शेकडो हस्तकही मारले गेले आहेत.
इस्रायलच्या उत्तरेला असणाऱ्या लेबेनॉन या देशाच्या दक्षिण भागात फोफावलेल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेनेही या वर्षभराच्या काळात इस्रायलवर अनेक हल्ले केले आहेत. तथापि, इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्dयांमध्ये या संघटनेची प्रचंड हानी झाली. हिजबुल्लाचेही 5 हजारांहून अधिक हस्तक आणि नेते मारले गेले आहेत. या संघर्षाला 1 वर्ष पूर्ण होत असताना इस्रायल आणि इराण यांच्यातही संघर्ष भडकला असून इराणने इस्रायलवर 200 क्षेपणास्त्रे डागली होती.
आयर्न डोममुळे संरक्षण
इस्रायलने अमेरिकेच्या सहकार्याने विकसीत केलेल्या आयर्न डोम नामक संरक्षक तंत्रज्ञानामुळे हमास, हिजबुल्ला आणि इराण यांच्याकडून होणाऱ्या अग्नीबाण आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून इस्रायलचे संरक्षण झाले आहे. या तीन्हीकंडून दहा हजारांहून अधिक अग्नीबाण आणि 200 हून अधिक क्षेपणास्त्रे या एका वर्षात इस्रायलवर सोडण्यात आली. तथापि, त्यांच्यातील 99 टक्के हवेतच जळून गेल्याने इस्रायलची हानी अत्यल्प झाली. इस्रायलवर अणुबाँब क्षेपणास्त्र टाकले तरी त्यापासून या देशाचे संरक्षण करण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता आहे, असे तज्ञांचे मत आहे.
पेजर हल्ला हे वैशिष्ट्या
या संघर्षाला एक वर्ष होत असताना हिजबुल्लावर झालेला ‘पेजर हल्ला’ हे या संघर्षाचे अनोखे वैशिष्ट्या ठरले आहे. हिजबुल्लाकडून मोबाईलचा उपयोग न केला जाता जुन्या पेजर तंत्रज्ञानाचा केला जातो. या पेजर्समध्येच स्फोटके दडविल्याने आणि एकाच वेळी अशा 10 हजारांहून अधिक पेजर्सचा स्फोट झाल्याने हिजबुल्लाचे अनेक हस्तक आणि दहशतवादी ठार झाले होते. तसेच हजारो जखमी झाले होते. या हल्ल्यामुळे हिजबुल्लाची दूरसंचार यंत्रणा कोलमडली असून या संघटनेचे नीतीधैर्य खच्ची होण्यास हा हल्ला कारणीभूत ठरल्याचे तज्ञांचे मत आहे. हा संघर्ष अजून बराच काळ होणार असल्याचेही स्पष्ट आहे.
हमास, हिजबुल्लाचे अनेक नेते ठार
हमास आणि हिजबुल्ला या इराण समर्थित दशहतवादी संघटना आहेत. त्यांना इराणकडून शस्त्रे, पैसा आणि प्रशिक्षण दिले जाते. इस्रायलने या वर्षभराच्या काळात या दोन्ही संघटनांचे किमान 50 वरीष्ठ नेत्यांना कंठस्नान घातले आहे. विशेषत: गेल्या दोन आठवड्यांमध्ये हिजबुल्लाचे किमान सात महत्वाचे आणि प्रमुख नेते मारण्यात आले आहेत. त्यांच्यात संघटनेचा प्रमुख नसरल्ला, त्याचा वारसदार सफिद्दी आणि त्याचाही वारसदार यांचा समावेश आहे हमास या संघटनेचा म्होरक्या अबु हनिया याला प्रत्यक्ष इराणमध्येच ठार करण्यात आले.
वर्षाअखेरीस इस्रायलचे वर्चस्व
7 ऑक्टोबर 2023 च्या अनपेक्षित हल्ल्यानंतर इस्रायल काही काळ बॅकफूटवर आल्याचे दिसत होते. तथापि, संघर्षाला एक वर्ष पूर्ण होत असताना आता या देशाची सरशी होत असताना दिसून येते. इस्रायलच्या प्रचंड सैन्यशक्तीसमोर आणि अमेरिकेने त्याला दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर इस्रायलने उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही आघाड्यांवर, अनुक्रमे हमास आणि हिजबुल्ला या संघटनांच्याविरोधात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळविल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. इराणनेही अद्याप इस्रायलविरोधात थेट युद्ध पुकारलेले नाही.
नेतान्याहूंच्या लोकप्रियतेत वाढ
7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर नेतान्याहू यांच्या विरोधात इस्रायलमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. इस्रायलने लवकरात लवकर हमासने अपहरण केलेल्या नागरीकांची सुटका करावी आणि शस्त्रसंधी करावी, असा दबाव इस्रायली नागरीकांकडूनच त्यांच्यावर येत होता. तथापि, वर्ष पूर्ण होता होता, पुन्हा इस्रायल एकजीव होऊन नेत्यान्याहू यांना सहकार्य करताना दिसत आहे. हमास आणि हिजबुल्ला यांचा नायनाट केल्याशिवाय आपल्याला सुखाने जगता येणार नाही, हा नेतान्याहू यांचा संदेश जनतेला पटू लागला आहे, असे या संदर्भात केलेल्या काही सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे.
इस्रालयकडून व्हिडीओ प्रसिद्ध
आपल्यावरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने इस्रायलने त्या हल्ल्याचे आणखी काही व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. या व्हिडीओंमधून त्या हल्ल्याची भीषणता अधिक तीव्रपणे स्पष्ट होत आहे. इस्रालयच्या या अमानुष शत्रूंचा नायनाट करणे हे आमचे ध्येय असल्याचे इस्रायली सेनादलांनी या निमित्त पुन्हा स्पष्ट केले.