वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती : वेर्णा, बार्देशात अत्याधुनिक उपकेंद्रे उभारणार
प्रतिनिधी/ मडगाव
पेडणे ते काणकोण महामार्गाच्या कामाचे श्रेय माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माझे आहे. येत्या काही दिवसांत आम्ही संपूर्ण गोव्यात वीज सुविधा अद्ययावत करणे व नूतनीकरण यासाठी 1000 कोटींहून अधिक खर्च करणार आहोत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी शनिवारी मडगावात बोलताना दिली. अत्याधुनिक सबस्टेशन वेर्णा येथे 250 कोटी खर्चून, तर बार्देशमध्ये 350 कोटींचे सबस्टेशन उभारण्यात येणार असून लवकरच त्यांची पायाभरणी करण्यात येणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
कुंकळ्ळी वीज उपकेंद्र ते फातोर्डा उपकेंद्र व राय उपकेंद्र अशी भूमिगत वीजवाहिनी आणि फातोर्डा उपकेंद्र ते राय उपकेंद्र इंटरलिंक केबल पुरविणे, टाकणे, चाचणी घेणे व कार्यान्वित करणे या कामांचा पायाभरणी समारंभ मडगावातील बीपीएस क्लबमध्ये झाला. वीजमंत्री ढवळीकर यांच्या हस्ते ही पायाभरणी झाली. यावेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच वीजखात्याचे मुख्य अभियंता राजीव सामंत, कार्यकारी अभियंता डायगो कुतिन्हो आदी उपस्थित होते.
प्रत्येक वीजमंत्र्याने यापूर्वी आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून कामे केली. मात्र आपल्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निधी उपलब्ध केल्याने सर्वत्र कामे करणे शक्य झाले आहे. या कामांसाठी 40 टक्के निधी राज्य सरकार देत असते, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. मांद्रे, वास्को, मडगाव, बाणावली येथे कोट्यावधींची कामे हाती घेण्यात आली आहेत. हे सर्व लोकांच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वीजखात्याचे अधिकारी त्यासाठी झटत असल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत, असे ते पुढे म्हणाले.
वीज क्षेत्रात परिवर्तन
गोव्यात वीज क्षेत्रात परिवर्तन होत असल्याचे दिसून येते. फातोर्डा आणि कुडतरीतील सबस्टेशन्स अद्ययावत केली जाणार आहेत तसेच प्रत्येकी 5 ट्रान्स्फॉर्मर्स उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. पूर्वी मडगाव, फातोर्डाला पाणीपुरवठा करणारी साळावलीची जुनी वाहिनी दाब वाढला की फुटायची. मी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना ती मडगाव आणि वास्कोपर्यंत बदलली गेली, म्हणून या भागाला सुरळीत पाणीपुरवठा होत आला आहे, असे त्यांनी नजरेस आणून दिले.
विकासकामांसाठी दिला होता पाठिंबा : सरदेसाई
सुदिन ढवळीकर आणि आपण सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. साडेसोळा हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण होण्यासाठी असलेले सरकार पुढे चालू राहावे म्हणून तो पाठिंबा दिला होता. जे मोठे पूल तयार झाले त्यांचे उद्घाटन कोणीही करूद्यात, पण आम्ही त्यावेळी सरकारला पाठिंबा देण्यामागे अशी विकासकामे मार्गी लागावीत हे कारण होते, असे सरदेसाई यांनी सांगितले.
दशकभरापासूनची विजेची समस्या यामुळे सुटणार असल्याने समाधान होत आहे. फातोर्डातील लोकांची वीजसमस्या सुटावी यासाठी विधानसभेत आपण आवाज उठवत आलेलो आहे, असे आमदार सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. आपल्या मतदारसंघातील वीजसमस्या सोडविण्यासाठी मंत्री ढवळीकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण त्यांचा आभारी आहे. फोंडा व वेर्णा येथून फातोर्डा मतदारसंघाला वीजपुरवठा होत होता, आता कुंकळ्ळीतून वीजपुरवठा होईल, असे ते म्हणाले.
भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे आश्वासन मला मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांनी दिले होते, असे सांगून, ते आता पूर्ण होत असल्याबद्दल उभयतांचे आमदार लॉरेन्स यांनी आभार मानले. विरोधक नेहमीच वीज समस्येवरून माझ्यावर टीका करत आले आहेत. आता येथे कामे हाती घेण्यात आल्याने त्यांनी प्रशंसाही करावी, असे लॉरेन्स म्हणाले. 24 तास वीज मिळावी अशी लोकांची अपेक्षा असते. फातोर्डातील सबस्टेशन आणि कुडतरी मतदारसंघातील राय सबस्टेशन यांना वेर्णातून पुरवठा होत असला, तरी कोविडनंतर विजेची मागणी वाढली आहे. म्हणून ही नवीन 33 केव्ही वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 40.5 कोटी ऊपये त्यावर खर्च येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सामंत यांनी स्वागतपर भाषणात दिली.









