अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा ः मृतांमध्ये निम्मे प्रायव्हेट मिलिट्री वॅगनरचे सदस्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशिया-युक्रेन युद्धावरून अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने नवी माहिती सादर केली आहे. युद्धात आतापर्यंत रशियाचे 1 लाखाहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर मागील 5 महिन्यांमध्ये रशियाचे 80 हजार सैनिक जखमी झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

मागील 5 महिन्यांमध्ये 20 हजारांहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यातील निम्म्याहून अधिक जण प्रायव्हेट मिलिट्री ग्रूप वॅगनरचे सदस्य होते. वॅगनर ग्रूपच्या सदस्यांनी युक्रेनच्या बाखमुत भागात स्वतःचा जीव गमावला असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी गुप्तचर यंत्रणेचा दाखला देत म्हटले आहे.
रशिया मागील वर्षापासून युक्रेनच्या छोटय़ा शहरांवर कब्जा करण्याची योजना आखत आहे. रशियाला याप्रकरणी फारसे यश मिळालेले नाही. बाखमुतमध्ये 5 महिन्यांपेक्षा अधिक काळाच्या लढाईनंतरही रशियाला आगेकूच करता आलेली नाही. बाखमुतद्वारे युक्रेनच्या डोनबासवर कब्जा करण्यात रशिया पिछाडला जात असल्याचे किर्बी यांनी सांगितले आहे. परंतु किर्बी यांनी युक्रेनच्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचा आकडा जाहीर करण्यास नकार दिला आहे. युक्रेन हा रशियाकडून लादण्यात आलेल्या युद्धाचा पीडित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशियाचे सैन्य थकलेले
रशियाने स्वतःच्या शस्त्रास्त्रांवर मोठा खर्च केला आहे. परंतु आता लांबत चाललेल्या युद्धामुळे त्याचे सैनिक थकले आहेत. युपेनच्या एअर डिफेन्सने रशियाकडून सोमवारी डागण्यात आलेल्या 18 पैकी 15 क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट केले आहे. तर 3 क्षेपणास्त्रांमुळे 2 जणांना जीव गमवावा लागला असून 40 जण जखमी झाले आहेत अशी माहिती किर्बी यांनी दिली आहे. रशियाच्या हल्ल्यात शाळेत जाणाऱया एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी सांगितले आहे.
पोप फ्रान्सिस यांचे प्रयत्न
ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी एका गुप्त मोहिमेवर काम करत असल्याचे सांगितले आहे. चर्चेशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. एक मोहीम हाती घेण्यात आली असून यासंबंधी आताच अधिक माहिती देता येणार नसल्याचे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे.









