टिळकवाडी पोलिसांत फिर्याद
प्रतिनिधी/ बेळगाव
आश्रय कॉलनी, नानावाडी येथील निवृत्त जवानाचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने आणि चांदीच्या वस्तू लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
राजाराम दौलत पडवळ (वय 83, रा. आश्रय कॉलनी, नानावाडी) हे व त्यांची पत्नी निर्मला पुणे येथे स्थायिक असलेल्या आपल्या मुलाकडे गेले होते. चोरट्यांनी घर बंद असलेले पाहून कडीकोयंडा फोडून आत प्रवेश केला. 20 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 ग्रॅम चांदी असा एकूण 1 लाख 2 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
घराचा कुलुप तोडल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी याची माहिती राजाराम यांना दिली. बेळगावात दाखल होऊन टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.









