पॅकेटमध्ये 16 ऐवजी 15 बिस्किटे : ग्राहक न्यायालयाचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूमधील जिल्हा ग्राहक मंचाने एफएमसीजी कंपनी आयटीसीला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. सनफिस्ट मेरी लाईटच्या पॅकेटमध्ये 1 बिस्कीट कमी दिल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे. वास्तविक, कंपनीने सनफिस्ट मेरी लाइटच्या पॅकेटवर 16 बिस्किटे असल्याचा उल्लेख केला आहे, परंतु एका पॅकेटमध्ये 15 बिस्किटे असल्याचे निष्पन्न झाले होते.
तामिळनाडूच्या जिल्हा ग्राहक मंचाने बिस्कीटांची संख्या कमी असल्याचे मान्य केले आहे. मंचाने कंपनीला तक्रारदाराला 1 लाखाचा दंड आणि खटल्याचा खर्च म्हणून 10,000 देण्याचे आदेश दिले. यासोबतच अशा कमतरता असलेल्या बिस्किट पॅकची विक्री करू नये, अशा सूचनाही आयटीसीला देण्यात आल्या आहेत.
ग्राहक मंचापर्यंत कसे पोहोचले?
चेन्नईत राहणाऱ्या दिल्लीबाबूने भटक्या प्राण्यांना खायला देण्यासाठी मनालीतील एका विक्रेत्याकडून सनफिस्ट बिस्किटांची 25 पॅकेटस् विकत घेतली, पण जेव्हा त्याने पॅकेट उघडले तेव्हा त्याला एका पॅकेटमध्ये 15 बिस्किटे आढळली.
यानंतर दिल्लीबाबूंनी विक्रेता आणि आयटीसीकडे सदरचा मुद्दा मांडला, परंतु यातून त्यांचे समाधान झाले नाही. यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली.
बिस्किटांच्या पाकिटाचेही वजन कमी झाले
कंपनीने ग्राहक मंचाकडे असा युक्तिवाद केला की ते बिस्किटे प्रमाणानुसार नव्हे तर वजनानुसार विकतात. त्यानंतर त्याचे वजन केले असता ते 2 ग्रॅम कमी भरले. पॅकेटचे वजन 76 ग्रॅम असे लिहिले होते, तर पॅकेटचे वजन 74 ग्रॅम होते.
मात्र, न्यायालयाने आयटीसीचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला. वजनाच्या आधारे बिस्किटे विकण्याची बाब न्यायालयाने फेटाळून लावली. बिस्किटांच्या पाकिटावर हा क्रमांक स्पष्टपणे लिहिला असल्याचे न्यायालयाने सांगितले.









