वृत्तसंस्था/ मुंबई
एशियन पेंट्स या दिग्गज रंग उत्पादक कंपनीला पुढील दशकभरामध्ये एक लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करायचा आहे. यासंदर्भातले नवे उद्दिष्ट कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे.
एशियन पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)आणि व्यवस्थापकीय संचालक अमित शिंगले यांनी ही माहिती दिली आहे. घरासाठी लागणाऱ्या रंगासह इतर उत्पादनांच्या निर्मितीवर कंपनी आगामी काळामध्ये लक्ष देणार आहे. लाइटिंग प्रकारातही पाऊल ठेवलेले असून त्याचप्रमाणे यूपीव्हीसी दरवाजे आणि खिडक्या या क्षेत्रांमध्येसुद्धा कंपनी कार्यरत आहे. वुडन फ्लोरिंगसह किचन आणि बाथरूमसाठी लागणारे अॅक्सेसरीमध्येही लक्ष घातले जात आहे. यायोगे पाहता व्यवसाय विस्ताराच्या माध्यमातून कंपनीला आपले अस्तित्व भारतात दूरवर अधिक गडद करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, रंग उत्पादनामध्ये पाहता औद्योगिक रंगांचे क्षेत्र सात ते आठ टक्के इतके विकसित होणार असल्याची अपेक्षा आहे. सध्याला औद्योगिक रंगांचा व्यवसाय हा चार ते पाच टक्के इतका वाढीव दिसतो आहे. नव्या आणि कल्पक उत्पादनांच्या माध्यमातून कंपनी चांगली प्राप्ती करण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. भारतातील रंग उत्पादनाच्या बाजारामध्ये हिस्सेदारी उचलण्यामध्ये कंपनी आघाडीवर राहिली आहे.









