धोकादायक वळणावर टँकरच्या : जोरदार धडकेने कार कोसळली खाली
काणकोण : जिवाचा गोवा करायला आलेल्या मुंबईच्या अंधेरी पूर्व विभागातील युवकांच्या गटाच्या वाहनाला करमल घाट वळणावर झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत युवकाचे नाव वरुण गांधी (वय 19) असे असून जखमी झालेल्यांची नावे मेद पटवा (19), अमेय जंत्रे (19), सिया चौरदिया व सेहवी लोधा अशी आहेत. काल सोमवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा अपघात घडला. काणकोणच्या पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सदर युवक 18 रोजी मडगाव येथून रेंट-अ-कार घेऊन पाळोळे येथे आले होते. 19 रोजी त्याच वाहनाने मडगावला जात असताना काणकोणच्या दिशेने येणाऱ्या एका टँकरने करमल घाटातील धोकादायक वळणावर जोरदार धडक दिल्याने कार रस्त्याच्या बाजूने घळीत कोसळली आणि या वाहनाच्या खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जखमी झाले. काणकोणच्या पोलिसांनी पंचनामा करून जखमी झालेल्यांना पुढील उपचारांसाठी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मृत युवकाचा मृतदेह शवचिकित्सेसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात या वळणावर नऊपेक्षा अधिक अपघात झालेले असून गुळे ते बाळ्ळीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण कधी होईल तेव्हा होईल, निदान त्याआधी या धोकादायक वळणावर उपाययोजना करा, अशी जोरदार मागणी काणकोणचे नागरिक कित्येक दिवसांपासून करत आलेले आहेत. एका बाजूने गुळे ते करमल घाटपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला नुकतीच सभापती रमेश तवडकर यांनी सुरुवात केलेली आहे. पण पावसाळ्यापूर्वी जर करमल घाटातील धोकादायक वळणावर उपाययोजना केली नाही, तर या भागातील अपघातांची शृंखला चालूच राहण्याची भीती जागरुक नागरिकांनी व्यक्त केली आहे.









