बंगळूरहून गोव्यात सहलीसाठी येताना घडला अपघात : धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटला
फोंडा ; फोंडा-बेळगाव महामार्गावरील तिस्क उसगांव बगलमार्गावर भूमिका मैदानाजवळ पणसुले येथे कारगाडी दरीत कोसळून झालेल्या स्वयंअपघातात कारचालक जागीच ठार झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. धोकादायक वळणावर कारचालकाचा ताबा गेल्याने कारगाडी सरळ 13 मिटर खोल दरीत पडली. सदर घटना काल बुधवारी दुपारी 12 वा. सुमारास घडली. कारचालक विनोदकुमार कृष्णाप्पा (31, बंगळूर) हा जागीच ठार झाला असून मनराजू मंजूअप्पा (40), मुनीराजू मुनाजिनाप्पा (40), व्यंकटराजू नागराजू (38), लोकाश जंगप्पा (40) तिघेही बंगळूर येथील गंभीर जखमी झाले आहेत. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळूर येथून ब्रेझा कारगाडी केए 03 एनएन 2470 ने चारजण मोलेमार्गे गोव्यात दाखल झाले होते. धारबांदोडयाहून फोंड्याकडे येताना तिस्क उसगांव जन्क्शन ओलांडल्यानंतर पणसुले बगलरस्त्यावरील धोकादायक वळणावर कारचालकाचा ताबा गेल्याने कारगाडी सरळ 13 मिटर खोल दरीत कोसळली. यावेळी कारगाडीतून बाहेर पडलेला नंतर कारगाडीला आपटून डोक्याला मार लागून जागीच ठार झाला. नेमका कारगाडी कोण चालवत होता याबाबत माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. मात्र सदर अपघातात कारचालक ठार झाल्याचे पोलिसांनी पंचानाम्यान नमूद पेले आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार देवीदास पर्येकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला असून इतर जखमीवर फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहे. सदर धोकादायक वळणावर संरक्षक कठडा बांधण्यात यावा अशी मागणी मागील काही वर्षापासून स्थानिक करीत असून अजूनपर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने हा मोठा अनर्थ घडल्याचा संताप व्यक्त केला आहे. एखाद्या पर्यटकाचा जीव गामावल्यानंतर प्रशासनाला जाग येते असा निंदनीय प्रकार घडलेला आहे.









