रथयात्रेच्या स्वागतानंतर धर्मसभेत श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांची घोषणा
प्रतिनिधी /काणकोण
अयोध्येत साकार होणाऱया श्री राममंदिरासाठी पर्तगाळी जिवोत्तम मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी पर्तगाळी मठ परंपरेतील 23 वे स्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या स्मरणार्थ पर्तगाळी मठातर्फे 1 कोटी 8 लाख 77 हजार 777 रुपयांची देणगी घोषित केली आहे.
श्रीराम दिग्विजय रथयात्रेचे पर्तगाळी मठात स्वागत केल्यानंतर आयोजित केलेल्या धर्मसभेच्या वेळी आशीर्वचन देताना पर्तगाळी मठाधीशांनी प. पू शक्ती शांतानंद महर्षी, मठ समितीचे पदाधिकारी आणि मठानुयायांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी प. पू स्वामी महाराजांनी 5 या अंकाचे महत्त्व विषद करताना 5 ऑगस्ट रोजी मंदिराचा शिलान्यास, 5 ऑक्टोबर रोजी रथयात्रेला प्रारंभ आणि 5 नोव्हेंबर रोजी पर्तगाळी मठात आगमन होणे हा एक विलक्षण योगायोग असल्याचे सांगितले.
त्यापूर्वी वाद्यवृंदाचे वादन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीराम दिग्विजय रथाचे आगमन झाल्यानंतर स्वामी महाराजांनी रथाचे स्वागत करून विधिवत पूजन केले. त्यानंतर झालेल्या धर्मसभेच्या वेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी स्वागत केले. या समारंभाला आमदार दिगंबर कामत, शिवानंद साळगावकर, अन्य पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे परशुराम शेट्टी, श्याम नाईक, माजी आमदार मोहन आमशेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले.
6 रोजी पैंगीणच्या श्री परशुराम पंचैग्राम देवस्थान समितीतर्फे श्रीराम दिग्विजय रथाचे पैंगीण येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर, अर्चक निशाकांत टेंगसे, दामोदर फळगावकर, डॉ. पुष्पा अय्या, अन्य पदाधिकारी तसेच भाविक मोठया संख्येने अपस्थित होते. त्यानंतर पैंगीण ते पोळे चेकनाक्यापर्यंत काढण्यात आलेल्या फेरीत असंख्य दुचाकीस्वारांनी भाग घेतला. या रथयात्रेला पोळे चेकनाक्यावर निरोप देण्यात आला.









