जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली माहिती
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. त्या चेकपोस्टच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 49 लाखांची दारू व रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र व गोवा सीमेवर 20 चेकपोस्ट सध्या कार्यरत आहेत. या चेकपोस्टवर वाहनांची झडती घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी 1 कोटी 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आहे. निवडणुकीच्या तयारीला सारे लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनधिकृत बॅनर्स, पोस्टर, भित्तीपत्रके हटविण्यात आल्याची माहितीही महापालिका आयुक्तांनी दिली. काही जणांना नोटीसही देण्यात आली आहे. बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर परवानगी देताना एक खिडकी योजनेद्वारे देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांशी समन्वय साधून परवानगी द्यावी, असेही सांगण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोवर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील हे या कॉन्फरन्सला उपस्थित होते.









