रिलायन्सच्या मूल्यात 48 हजार कोटींची भर : 709 अंकांनी वधारला सेन्सेक्स
वृत्तसंस्था/ मुंबई
मागच्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या दहा पैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 72 हजार 148 कोटी रुपयांनी वाढले होते. मागच्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्यात सर्वाधिक वाढ नोंदलेली पाहायला मिळाली.
मागच्या आठवड्यात पाहता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 709 अंकांनी म्हणजेच 0.87 टक्के वाढत बंद झाला. यामध्ये पाहता रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक यांच्या बाजार भांडवल मूल्यांमध्ये मात्र घसरण झालेली दिसली.
यांचे मूल्य वाढले
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या बाजार भांडवलामध्ये मागच्या आठवड्यात 48,107 कोटी रुपयांची भर घातली असून त्यांचे बाजार भांडवल मूल्य आता 19,07,131 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासोबतच हिंदुस्तान युनिलिव्हरचे 34 हजार 280 कोटी रुपयांनी भांडवल वाढत 6,17,672 कोटी रुपये आणि भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 33,899 कोटी रुपयांनी वाढत 11,02,159 कोटी रुपयांवर पोहोचले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 20,413 कोटी रुपयांनी वाढत 5,55,961 कोटी रुपयांवर तर इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 16,693 कोटी रुपयांनी वाढत 6,18,004 कोटी रुपयांवर पोहोचले. टीसीएसचे बाजार भांडवल मूल्यही 11487 कोटी रुपयांनी वाढत 11,04,837 कोटी रुपयांवर स्थिरावले.
यांच्या मूल्यात घसरण
एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य मात्र 20,040 कोटी रुपयांनी कमी होत 15,08,346 कोटी रुपयांवर घसरले तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 9784 कोटी रुपयांनी कमी होत 7 लाख 53 हजार 310 कोटी रुपयांवर स्थिरावले होते.









