वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात रस्ते दुर्घटनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेत मोठी भर पडली आहे. यावरून आता नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) धक्कादायक आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये रस्ते दुर्घटनांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. एनसीआरबीच्या अहवालात उत्तरप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, ओडिशा, तेलंगणा, आसाम आणि दिल्लीत सर्वात रस्ते दुर्घटना घडल्या आहेत. तर पश्चिम बंगाल वगळता पूर्ण देशात मागील वर्षी रस्ते दुर्घटनांमुळे 1 लाख 70 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे.
देशातील रस्ते दुर्घटनांचे प्रमुख कारण ओव्हरस्पीडिंग आहे. बहुतांश दुर्घटना आणि त्यातील बळी हे ओव्हरस्पीडिंगमुळेच गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. तसेच वाहतूक नियमांचे पालन न होणे देखील रस्ते दुर्घटनांचे मोठे कारण आहे.
पश्चिम बंगालची आकडेवारी नाही
2023 मध्ये रस्ते दुर्घटनांमुळे 1 लाख 73 हजार लोकांचा मृत्यू झाला होता, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 6,027 लोकांचा मृत्यू रस्ते दुर्घटनांमुळे ओढवला होता. परंतु पश्चिम बंगालने अद्याप 2024 मध्ये झालेल्या रस्ते दुर्घटनांचा आकडा सादर केलेला नाही. हा आकडा समोर आल्यावर 2024 मध्ये झालेल्या रस्ते दुर्घटनांमधील बळींची संख्या आणखी वाढणार आहे.
कुठल्या राज्यात रस्ते दुर्घटनांमुळे किती मृत्यू?
राज्य 2023 2024
उत्तरप्रदेश 23,652 24,118
तामिळनाडू 1 8,347 18,449
महाराष्ट्र 15,366 15,715
मध्यप्रदेश 13,798 14,791
कर्नाटक 12.321 12,390
राजस्थान 11,762 11,790
बिहार 8,873 9,347
आंध्रप्रदेश 8,137 8,346
तेलंगणा 7,660 7,949
ओडिशा 5,739 6,142
9राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण घटले
रस्ते दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. परंतु तरीही अनेक राज्यांमध्ये दुर्घटनांमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. तर 9 राज्यांमध्ये रस्ते दुर्घटनांमधील बळींचा आकडा घटल्याचे दिसून आले आहे. या यादीत केरळ आणि गुजरातचे नाव देखील सामील आहे.









