सलग 5 व्यांदा 1.60 लाख कोटीहून अधिक कर संकलन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै महिन्यात 1,65,105 कोटी रुपयांचे जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) संकलन झाले आहे. जुलै 2022 च्या तुलनेत हा आकडा 11 टक्के अधिक राहिला आहे. सलग पाचव्यांदा जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. जीएसटी संकलनाच्या आकड्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेतील मागणीची स्थिती स्पष्ट होते.
जीएसटी संकलनात सीजीएसटीचा हिस्सा 29,773 कोटी रुपये राहिला आहे. तर एसजीएसटीचे प्रमाण 37,263 कोटी रुपये आणि आयजीएसटीचे प्रमाण 85,930 कोटी रुपये इतके आहे. वस्तूंच्या आयातीवर 41,239 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. तर अधिभाराद्वारे 11,779 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
यापूर्वी जून महिन्यात 1,61,497 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. परंतु आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले होते. तेव्हा हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांहून अधिक राहिला होता. याचबरोबर सलग 17 महिन्यांपासून देशाचे मासिक जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे.
जुलै महिन्यात जीएसटी संकलनाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र पहिल्या स्थानावर राहिले आहे. महाराष्ट्रात जीएसटी संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढून 26,064 कोटी रुपये राहिले आहे. या यादीत कर्नाटक 11,505 कोटी रुपयांच्या करसंकलनासह दुसऱ्या स्थानावर राहिले. तर तामिळनाडू 10,022 कोटी रुपयांच्या करसंकलनासह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये 9,783 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे.
नवा नियम लागू
ऑगस्ट महिना सुरू होताच अनेक नवे नियम लागू झाले आहेत. जीएसटीत देखील महत्त्वाचा बदल झाला आहे. नव्या दिशानिर्देशांनुसार 5 कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योग-व्यवसायांना ई-इनवॉयस जनरेट करावी लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 10 कोटी रुपयांची होती.









