गेल्यावषीच्या तुलनेत 10.2 टक्के जास्त, सलग सातव्यांदा 1.50 लाख कोटींच्या वर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर संकलनात सप्टेंबर 2023 केंद्र सरकारसाठी उत्तम महिना ठरला आहे. रविवारी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारी तिजोरीला सप्टेंबर महिन्यात जीएसटीमधून 1 लाख 62 हजार 712 कोटी रुपये प्राप्त झाले असून ते मागील वर्षाच्या म्हणजेच सप्टेंबर 2022 च्या तुलनेत 10.2 टक्के अधिक आहे.

सप्टेंबरमध्ये प्राप्त झालेले जवळपास 1.63 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन ऑगस्टच्या तुलनेत 2.3 टक्के अधिक आहे. मासिक जीएसटी संकलन 1.50 लाख कोटींच्या पुढे गेल्याचा हा सलग सातवा महिना आहे. तसेच कर संकलनाने 1.60 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केल्याचा चालू आर्थिक वर्षातील हा चौथा महिना आहे. फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या अर्थसंकल्पानुसार, केंद्राने जीएसटी संकलनात चालू आर्थिक वर्षात 12 टक्के वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली होती. ही अपेक्षापूर्ती होण्याच्या दृष्टीने सध्या यशस्वी वाटचाल सुरू असलेली दिसत आहे.
गेल्या महिन्यात एकूण जीएसटी महसूल 1,62,712 कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी 29,818 कोटी रुपये, राज्य जीएसटी 37,657 कोटी रुपये, आयजीएसटी 83,623 कोटी रुपये (माल आयातीवर जमा करण्यात आलेल्या 41,145 कोटी रुपयांसह) आणि उपकर 11,613 कोटी रुपये होता. उपकरामध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 881 कोटी रुपयांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल वार्षिक आधारावर 14 टक्क्यांनी वाढला आहे.
एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये सरकारने 1.59 लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा केला होता. तर जुलैमध्ये 1.65 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. सप्टेंबरमध्ये सलग सातव्यांदा महसूल संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. तथापि, आतापर्यंत सर्वोच्च जीएसटी संकलन एप्रिल 2023 मध्ये जमा झाले असून हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. याशिवाय, सलग 19 महिन्यांपासून देशाचे जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये म्हणजेच गेल्या पाच महिन्यांत आतापर्यंत एकूण 9.93 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण जीएसटी संकलन 18.10 लाख कोटी रुपये होते.
महाराष्ट्र अव्वल, कर्नाटक दुसऱ्या स्थानी
सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वषीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्यांनी वाढून 25,137 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 11,693 कोटी ऊपयांच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आणि 10,481 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.









