मागील वर्षाच्या तुलनेत संकलनात 12 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या अंमलबजावणीला सहा वर्षे पूर्ण झाली असतानाच जून महिन्यात पुन्हा एकदा सरकारी तिजोरीत जीएसटीमधून मोठी कमाई झाली आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवार, 1 जुलै रोजी जून 2023 महिन्यातील जीएसटी संकलन डेटा जाहीर असून सरकारला जून महिन्यात जीएसटीमधून 1.61 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत म्हणजेच जून 2022 च्या मानाने 12 टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी मे महिन्यातही जीएसटी संकलनात 12 टक्के वाढ झाली होती.
जून महिन्याच्या केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) अंतर्गत 31,013 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) अंतर्गत 38,292 कोटी रुपये प्राप्त झाले. तसेच एकात्मिक जीएसटीमधून (आयजीएसटी) 80,292 कोटी रुपये मिळाले असून त्यात 39,095 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर प्राप्त झाले आहेत. तसेच सेसमधून सरकारला 11,900 कोटी रुपये मिळाल्याचे अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. एकंदर जूनमधील करसंकलन 1 लाख 61 हजार 497 कोटी रुपये इतके आहे.
गेल्या सहा वर्षात सरकारी तिजोरीत जीएसटी वसुलीमधून मिळणारी रक्कम वाढत चाललेली दिसून येत आहे. मे महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1.57 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मे 2023 मध्ये सरकारी तिजोरीला मिळालेली ही कमाई एका वर्षापूर्वी म्हणजेच मे 2022 च्या तुलनेत 12 टक्के अधिक होती. मे महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात जीएसटीमधून 1.87 लाख कोटी रुपयांची कमाई झाल्यामुळे आतापर्यंतचा सर्वोत्तम विक्रम केला होता.
जीएसटीच्या 6 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत सहावेळा जीएसटीमधून 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. तसेच जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेला हा चौथा महिना आहे. इतकेच नाही तर गेल्या सलग 15 महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1.40 लाख कोटींहून अधिक महसूल गोळा करण्यात यश आले आहे.









