येडियुराप्पा यांच्या हस्ते वितरणाला चालना : उच्च शिक्षणासाठी अनुकूल
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना संकटकाळात उच्च शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने 1 लाख 55 हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट पीसी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी विधानसौध येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी 10 विद्यार्थ्यांना टॅब वितरीत करून या योजनेला चालना दिली.
राज्यात 430 सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालये, 87 सरकारी पॉलिटेक्निक आणि 14 सरकारी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 1.55 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरीत करण्यात येत आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने 163 कोटी रुपये खर्च केले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील तफावत दूर करण्यासाठी ही डिजिटल व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन येडियुराप्पा यांनी याप्रसंगी केले.
शिवाय राज्यात 27.77 कोटी रुपये खर्चुन 2,500 स्मार्ट क्लासरुम निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आधारित शिक्षण घेण्यास अनुकूल होणार आहे, असेही ते म्हणाले.
याच दरम्यान, सर्व जिल्हय़ांमध्ये महाविद्यालयांत जिल्हा पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. टॅब वितरणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी स्मार्ट क्लासरुमचे देखील मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले. तसेच स्मार्ट क्लासरुममध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी मुख्यमंत्र्यांना स्मार्ट क्लासरुमच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
कोरोना संकटकाळात आपल्या मदतीला आलेली तंत्रज्ञान आधारित अध्ययन व्यवस्था, टॅब आणि स्मार्ट क्लासरुमच्या उपयोगाचे अनुभव मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दोन विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले.









