मनपा सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय : विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : शहरातील उत्तर व दक्षिण भागातील ड्रेनेज समस्या ही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या ड्रेनेजसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मागीलवर्षी 2 कोटी 44 लाख रुपये खर्च करण्यात आले. बुधवारी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत यावर्षी 1 कोटी 50 लाख रुपये युजीडीच्या दुरुस्तीसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र ही महत्त्वाची समस्या असून त्यासाठी निधी राखीव ठेवलाच पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. युजीडीसाठी खर्च करण्यात येणारा निधी हा महापालिकेच्या माध्यमातूनच खर्च करण्याच्या निर्णयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्ष वाणी जोशी यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे पुढील बैठकीत कोणत्या योजनेच्या माध्यमातून निधी खर्च करायचा, याबाबत चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.
युजीडीच्या दुरुस्तीबाबत दक्षिणमध्ये दोन तर उत्तरमध्ये दोन विभाग करण्यात आले आहेत. त्यांना समांतर निधी देण्याची चर्चा झाली. मात्र दक्षिण विभागाची ड्रेनेजची समस्या अधिक असल्याने त्याकडे अधिक निधी द्यावा, असे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवकांनी युजीडीसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा लेखाजोखादेखील आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर युजीडी दुरुस्तीसाठी ई-टेंडर मागितले जाते. त्यानुसारच हा निधी खर्च केला जातो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकूणच युजीडीचा प्रश्न गंभीर बनत असून त्यासाठी कायम तोडगा काढण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या स्थायी समितीच्या बैठकीला महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे सदस्य व इतर नगरसेवक उपस्थित होते.









