कारमधून बेंगळूरहून रामदुर्गला पैसे पोहोचविण्याचा होता प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासणी तीव्र केली आहे. बुधवार दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी रामदुर्गजवळ एका कारमधून 1 कोटी 54 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून बेंगळूरहून रामदुर्गला आलेल्या इनोव्हामधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाला यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
रामदुर्ग-मुधोळ रोडवरील तुरनूर-ओबळापूर गावांमध्ये एक इनोव्हा कार अडवून पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात 500 च्या नोटा आढळून आल्या. या नोटा कोणाच्या? कोणाला पोहोचविण्यासाठी रामदुर्गला आणण्यात आल्या? याची चौकशी करण्यात आली. चालकाने समर्पक उत्तरे दिली नाहीत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणात रक्कम रामदुर्गला येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार बेंगळूरहून रामदुर्गकडे येणाऱ्या कारची प्रतीक्षा करण्यात येत होती. सायंकाळी ही इनोव्हा पोहोचताच पोलिसांनी कार अडविली. त्यावेळी चालकाला धक्का बसला. एका उमेदवारासंबंधीची ही रक्कम असल्याची माहिती मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तपास हाती घेतला आहे.









