पुणे / वार्ताहर :
परदेशात साखर निर्यात केल्यास चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवून व्यावसायिकाची 1 कोटी 57 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी डॉ. उमेश कृष्णा जोशी (वय 63, रा. डहाणूकर कॉलनी, पुणे) याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हसन अली पुरोहित (62, रा. अंधेरी, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 14 मार्च 2021 ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हसन पुरोहित यांनी आरोपी डॉ. उमेश जोशी यांच्या औरा एंटरप्रायजेस या कंपनीस 5184 टन साखर अमेरिकेत निर्यात करण्यासाठी दहा टक्के आगाऊ रक्कम म्हणून 1 कोटी 38 लाख 84 हजार रुपये ऑनलाईन जमा केले होते. त्यानंतर आरोपी जोशी याने ऑर्डर प्रमाणे संबंधित साखर परदेशात निर्यात करतो असे सांगितले. त्यानंतर साखर वाहतुकीसाठी कंटेनर बुकिंग करण्यात आला. परंतु आरोपीने साखर परदेशात निर्यात न करता तसेच दिलेली आगाऊ रक्कम व कंटेनर बुकिंगचे एकूण 1 कोटी 57 लाख 30 हजार रुपये स्वत:च्या फायद्याकरीता वापरले. तक्रारदार यांनी संबंधित पैशाची मागणी केली असता जोशी यांनी पैसे देण्यास नकार देऊन टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार पुरोहित यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.