पैज ठरली जीवघेणी
रशियात अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे. येथील एका 60 वर्षीय व्यक्तीचा 1.5 लिटर व्होडका पितानाच मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने ही व्होडका लाइव्हस्ट्रीमदरम्यान घेतली होती आणि लोक पाहत असतानाच त्याचा जीव गेला आहे. ‘ग्रँडफादर’ या नावाने प्रसिद्ध या व्यक्तीला एका युटय़ूबरने व्होडका रिचविण्याचे आव्हान देत या बदल्यात पैशांची ऑफर दिली होती. पश्चिम रशियातील स्मोलेंस्क येथील या घटनेचा पोलिसांनी तपास चालविला आहे. यूरी दुशेचकिनला युटय़ूबरने कथितरिन्या लाइव्ह मद्यपान किंवा हॉट सॉस खाण्याचे आव्हान दिले होते. हा पूर्ण प्रकार थेट प्रसारित होत होता आणि प्रेक्षक यूरीला मरताना पाहत होते. या घटनेला ही इंटरनेटवर एका भीतीदायक ट्रेंडचा हिस्सा मानण्यात येत आहे. या प्रकाराला ‘थ्रॅश स्ट्रीम’ किंवा ‘थ्रॅस स्ट्रीम’ही म्हटले जाते. यात लोकांना धोकादायक किंवा अपमानास्पद स्टंट करण्यास सांगण्यात येते. हे आव्हान पूर्ण करणाऱया लोकांना पैशांची ऑफर दिली जाते. तर ऑनलाइन स्वरुपात मोठय़ा संख्येत लोक याचे प्रेक्षक होतात.









