वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेल्या मार्च महिन्यामध्ये विमान प्रवाशांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता मार्चमध्ये विमान प्रवासी 8 टक्के वाढले आहेत. मार्च 2025 मध्ये 1 कोटी 45 लाख जणांनी विमानाने प्रवास केला आहे. मागच्या वर्षी मार्च 2024 मध्ये 1 कोटी 33 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला होता. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये इंडिगो या कंपनीने सर्वाधिक प्रवाशांना घेऊन जाण्याचा विक्रम केला आहे.
93 लाख जणांची इंडिगोला पसंती
मार्च महिन्यात पाहता 93 लाख प्रवाशांनी इंडिगो कंपनीचे विमान निवडणे योग्य मानले आहे. याच तुलनेमध्ये पाहता दुसरी मोठी कंपनी एअर इंडियाने मार्च महिन्यात 38 लाख प्रवाशांना विमानातून नेले होते. यासोबतच इतरही दोन विमान कंपन्या स्पर्धेमध्ये असून यापैकी अकासा एअरने 7 लाख 20 हजार आणि स्पाईसजेटने 4 लाख 80 हजार प्रवाशांना विमान प्रवास घडवला आहे.
इंडिगोच अग्रस्थानी
मार्च 2025 मध्ये पाहता प्रवाशांना योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये अर्थातच इंडिगोचा वाटा सर्वाधिक राहिलेला आहे. बाजारातील सध्याचा हिस्सेदारीचा विचार करता 65 टक्क्यांसह इंडिगो एअरलाइन्सने निर्विवाद वर्चस्व स्थापले असून 26 टक्के हिस्सेदारीसह एअर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर कार्यरत आहे.









