केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्हर्च्युअली राहणार उपस्थित
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या अंतर्गत सोमवारी मोठे पाऊल उचलले जाणार आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये एकूण 1.44 लाख किलोग्रॅम ड्रग्ज नष्ट करण्यात येणार आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे व्हर्च्युअल माध्यमातून या कार्यक्रमात सामील होतील. अमली पदार्थ नष्ट करण्याचे काम देशाच्या अनेक शहरांमध्ये पार पडणार आहे. ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ यासंबंधी आयोजित संमेलनादरम्यान शाह यांच्याकडून या कारवाईची व्हर्च्युअली पाहणी केली जाणार आहे.
नष्ट करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या हैदराबाद शाखेच्या कारवाईत जप्त 6,590 किलोग्रॅम ड्रग्ज सामील आहे. याचबरोबर इंदोर येथील शाखेच्या कारवाईत जप्त 822 किलोग्रॅम तर जम्मू एनसीबीकडून जप्त 356 किलोग्रॅम अमली पदार्थ आज नष्ट करण्यात येणार आहेत.
या राज्यांमध्येही होणार कारवाई
राज्य नष्ट करण्यात येणारे अमली पदार्थ (किलोमध्ये)
आसाम 1,486
चंदीगड 229
गोवा 25
गुजरात 4,277
हरियाणा 2,458
जम्मू-काश्मीर 4,069
मध्यप्रदेश 1,03,884
महाराष्ट्र 159
त्रिपुरा 1,803
उत्तर प्रदेश 4,049
लक्ष्यापेक्षा 11 पट अधिक जप्त ड्रग्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करण्यासाठी अमली पदार्थांच्या विरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले असल्याचे सांगण्यात आले. 1 जून 2022 पासून 15 जुलै 2023 पर्यंत एनसीबीच्या सर्व क्षेत्रीय शाखा आणि राज्यांच्या यंत्रणांनी सुमारे 9,580 कोटी रुपये किमतीचे जवळपास 8,76,554 किलोग्रॅम जप्त अमली पदार्थ नष्ट केले आहेत. हे प्रमाण निर्धारित लक्ष्यापेक्षा 11 पट अधिक आहे. सोमवारच्या कारवाईनंतर एका वर्षात नष्ट करण्यात आलेल्या एकूण ड्रग्जचे प्रमाण सुमारे 10 लाख किलोग्रॅमपर्यंत पोहोचणार आहे. याची एकूण किंमत सुमारे 12 हजार कोटी रुपये होईल.









