असमान वितरण, खंडानंतरही दीड महिन्यांत देशात सरासरीच्या 1.34 टक्के अधिक पाऊस, काही भाग प्रतीक्षेतच
अर्चना माने-भारती / पुणे :
तब्बल दीड महिन्यांनंतर मान्सूनने देशभरात पावसाची सरासरी गाठली आहे. देशभरात 1 जून ते 13 जुलैच्या कालावधीत 279.4 मिमी इतका पाऊस झाला असून, सरासरीच्या 1.34 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जुलै अर्धा उलटल्यानंतरही पावसाचा खंड, असमान वितरण आदींशी देशाला सामना करावा लागत आहे. काही भागात पावसाने ओढ दिली असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात सर्वदूर पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
8 जूनला केरळात दाखल झाल्यानंतर 2 जुलैला मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. जून महिन्यातील पावसातील ओढीनंतर या महिन्यात तुटीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. जून महिन्याचा शेवट तसेच जुलैच्या पहिल्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. कधी वायव्य भारत, कधी पूर्वोत्तर, तर सध्या उत्तर भारतात पावसाचा भर राहिला. यामुळे वायव्य भारतातील बहुतांश राज्यात अतिवृष्टी झाली असून, मध्य भारत, पूर्वोत्तर भारतात पावसाची तूट मोठय़ा प्रमाणात आहे. देशभरात 1 जून ते 13 जुलैच्या कालावधीत 275.7 मिमी इतका पाऊस होतो, यंदा मात्र तो 279.4 मिमी इतका नोंदविण्यात आला आहे. तो सरासरीच्या 1.34 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
राजधानीत दिल्लीसह 6 राज्यात अतीवृष्टी
राजधानी दिल्लीसह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी झाली आहे. यात दिल्लीत सरासरीच्या 103, गुजरात 106, राजस्थान 135, हरियाणा 86, पंजाब 86, हिमाचल प्रदेशात 101 टक्के पाऊस पडला आहे.
सिक्कीम, उत्तराखंड, सिक्कीममध्ये अतिरिक्त पाऊस
सिक्कीम, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये अतिरिक्त पाऊस झाला असून, येथे अनुक्रमे सरासरीच्या 24, 28, 27 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
गोव्यात समाधानकारक पाऊस
गोव्यासह अकरा राज्यात पाऊस सरासरीच्या आसपास राहिला आहे. गोव्यात सरासरीच्या 7, आंध्र प्रदेश उणे 14, छत्तीसगड उणे 19, मध्य प्रदेश 15, उत्तरप्रदेश 14, पश्चिम बंगाल उणे 13, जम्मू काश्मीर 17, आसाम उणे 6, मेघालय 13, त्रिपुरा 15 टक्के, अंदमान निकोबार बेटे 17 टक्के पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक तुटीत
महाराष्ट्र, कर्नाटक तसेच केरळ आदी राज्यात पावसाने ओढ दिली असून, येथे तुटीचा पाऊस झाला आहे. याचा मोठा परिणाम शेतीवरही झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के कमी, कर्नाटकात उणे 26, केरळात उणे 33, तेलंगणा उणे 27, ओरिसा उणे 27, झारखंड उणे 44, बिहार उणे 33, अरुणाचल प्रदेश उणे 22, नागालँड उणे 26, मणीपूर उणे 41, मिझोराम उणे 41 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.
दमण आणि दीव अवर्षणात
दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात दुष्काळाची स्थिती असून, येथे सरासरीच्या उणे 80 टक्के पाऊस झाला आहे.
आता लवकरच दमदार पाऊस
सध्या उत्तरेत पावसाचे थैमान सुरू आहे. या भागातील नद्यांना पूर आला असून, रस्ते, वाडय़ा वस्त्या वाहून गेल्या आहेत. राजस्थान, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. 16 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती व या स्थितीचे पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार असल्याने पूर्व, पूर्वोत्तर भारतात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातही पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे. कोकण-गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार, तर शनिवारी मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.









