प्रतिनिधी /काणकोण
दुमाणे, काणकोण येथील जंक्शनवर संशयास्पदरीत्या उभा असलेल्या एका व्यक्तीकडून काणकोणच्या पोलिसांनी 1.230 किलोग्रॅम इतका गांजा जप्त केला असून त्याची किंमत 1 लाख 23 हजार रु. इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या सदर संशयिताचे नाव हरिश्चंद्र हजारी नायक असे असून तो कुद्रा, ओरिसा येथील निवासी आहे.
पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस, उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, रिफा बार्रेटो, हवालदार उद्देश केरकर, नंदू गोसावी, प्रकाश नाईक त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी मिलिंद सैल, राघव पागी, अविराज साखळकर, मुपेश शेट आणि चालक पुंडलिक नावेलकर यांनी 22 रोजी रात्री गस्त घालताना ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.









