गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद जवळ जवळ पूर्ण
प्रतिनिधी / मडगाव
आयसीआयसीआय बँकेकडून 1.20 कोटीची कथित फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या या बँकेच्या आर्लेम शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक तथा संशयित गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल मंगळवारी 28 रोजी मडगावच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
या कथित फसवणूक प्रकरणी मायणा -कुडतरी पोलीस स्थानकात या प्रकरणातील पीडित व्यक्तीने तक्रार केलेली असून अटकेच्या भितीने संशयिताने न्यायालयात धाव घेतलेली आहे.
महत्वाचे म्हणजे संशयित अर्जदार गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी कुडतरी पोलिसांच्या व्यतिरिक्त आणखी चारजणांनी न्यायालयात अर्ज केलेले आहेत. त्यात खुद्द आयसीआयसीआय बँकेचाही समावेश आहे.
4 जणांच्या हस्तक्षेप याचिका
9 जुलै 2020 रोजी या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नाडिस याच्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली तेव्हा आणखी चारजणांनी संशयित गुल्शन गुसाई याच्या विरोधात हस्तक्षेप (इंटरवेन्शन) करणाऱया याचिका सादर केल्या होत्या.
तक्रारीनुसार मडगाव परिसरात राहणाऱया पै नावाच्या एका ग्राहकाच्या खात्यात असलेल्या एकूण रकमेपैकी या प्रकरणातील संशयितानी सुमारे 1.20 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
जाणीवपूर्वक फसवणूक करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे, कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संबंधीत प्राधिकरणाकडे सादर करणे यासारखे आरोप संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्यावर आहेत.
मंगळवारी या प्रकरणावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नाडिस यांच्या न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा संशयित अर्जदार गुल्शन गुसाई याच्यातर्फे ऍड. राजीव गोम्स, सरकारपक्षातर्फे सरकारी वकील कोरगावकर, एका हस्तक्षेप याचिकादारातर्फे ऍड. अवधूत आर्सेकर, ऍड. सिंगबाळ न्यायालयात उपस्थित होते. संशयित गुल्शन गुसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला या प्रकरणातील प्रतिवाद्यांनी जोरदार विरोध करणारा युक्तिवाद केला. यापुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे), 406 ( मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार केल्याप्रकरणी शिक्षा होणे), 409 (बँक व्यवसायिकाने केलेला फौजदारीपात्र गुन्हा), 418 (ज्या व्यक्तीचे हित जपण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीला हानी पोहोचेल याची जाणीव असणे), 420 (जाणीवपूर्वक फसवणूक करणे), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे), 471 (कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून प्राधिकरणाकडे सादर करणे) यासारख्या कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहेत.









