व्यापाऱ्यांना योग्य सोयी-सुविधा देण्यात मनपा अपयशी ठरल्याचा स्टॉलधारकांचा आरोप
पणजी : यंदाच्या अष्टमी फेरीच्या माध्यमातून पणजी मनपाने एक कोटीपेक्षा जास्त महसूल गोळा केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र या फेरीत दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यात मनपा अपयशी ठरल्याचा आरोप जाता जाता काही स्टॉलधारकांनी केले आहेत.पणजीत अष्टमीपासून गणेश चतुर्थी पर्यंतच्या काळात फेरी आयोजित करण्यात येते. यंदा या फेरीत सुमारे 400 दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यांची प्रत्येकी फी, भाडे, आणि अन्य आकारणी यांच्या माध्यमातून हा सुमारे 1.15 कोटी ऊपये महसूल गोळा करण्यात आला आहे. तेथील एका व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी प्रत्येक स्टॉलसाठी 6000 ऊपये आकारण्यात येत होते. यंदा त्यात कित्येक पटीनी वाढ करत तेवढ्याच जागेसाठी 26,500 ऊपये आकारण्यात आले. तरीही मनपाने एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या व्यापाऱ्यांसाठी शौचालये, स्वच्छतागृहे यांची योग्य उपलब्धता करून दिली नाही.
400 स्टॉल्सवर प्रत्येकी किमान चार व्यक्ती गृहित धरल्या तरी 1600 लोक रोज या भागात वावरत होते. यातील बहुसंख्य हे बिगर गोमंतकीय होते व 24 तास स्टॉल्सवरच घालविण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. अशावेळी त्यांच्यासाठी योग्य शौचालये, स्वच्छतागृहे यांची व्यवस्था करणे हे मनपाचे कर्तव्य होते. मात्र त्याकामी मनपा अपयशी ठरली. मनपाने त्यांच्यासाठी केवळ नऊ मोबाईल टॉयलेट युनिटस् उपलब्ध करून दिले. परिणामी अनेकांवर खुल्या जागेत मिळेल तेथे नैसर्गिक आणि अन्य विधी करावे लागले, अशी कैफियत सदर व्यक्तीने मांडली. त्यातून सर्वत्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सर्वत्र दुर्गंधीमुळे त्यांना त्या भागात निवास करणे असह्य बनले, असेही सांगण्यात आले. जी अल्प प्रमाणात शौचालये स्थापन करण्यात आली त्यांच्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करण्यातही मनपाने गांभीर्य दाखविले नाही. परिणामी अनेक व्यापाऱ्यांनी पणजी मार्केट आणि जवळच्या भागात असलेल्या शौचालयांचा वापर केला, अशी माहिती देण्यात आली.









